कोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घटला असल्याचे चित्र पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे, रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव, रमेश कदम, उदय सामंत, शेखर निकम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांच्यासारख्या नेतेमंडळींमुळे अल्प काळातच या पक्षाने चांगली पाळेमुळे रोवली. किंबहुना, काँग्रेस या सेनेच्या परंपरागत प्रतिस्पध्र्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा स्पर्धक बनला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यामुळेही सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला.  एकीकडे अशा प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढत असतानाच दुसरीकडे पक्षांतर्गत गटा-तटाच्या राजकारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पोखरला गेला. भास्कर जाधव विरुद्ध तटकरे, कदम आणि सामंत असे चित्र येथे दिसू लागले. राज्य पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार केसरकर व जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला. त्यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि केसरकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मोठय़ा गटाने शिवसेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अशा प्रकारे सामंत आणि केसरकरांच्या पक्षत्यागामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव घटला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या या दोन उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यावरूनही ते स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यातही तटकरे यांचा पुतण्या अवधूत यांचाही निसटता विजय झाला. कारण त्यांना तटकरेंच्या कुटुंबातूनच विरोध होता.  
अशा परिस्थितीत कोकणात पुन्हा एकदा पक्षाला बळकटी आणण्याची अवघड कामगिरी मागे राहिलेल्या तटकरे किंवा जाधवांसारख्या नेत्यांवर आहे, पण त्या दोघांमध्ये असलेले ‘सख्य’ लक्षात घेता हे काम आणखी बिकट झाले आहे. या निवडणुकीत दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते संजय कदम विजयी झाले आहेत, पण तेथे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कदम यांना तालुक्यातून पक्षांतर्गत विरोध कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही केसरकरांच्या तोलामोलाचा राजकीय नेता राष्ट्रवादीकडे नाही. हे सर्व चित्र लक्षात घेता आगामी काळात राष्ट्रवादीला गावपातळीवर पक्षबांधणीकडे विशेष लक्ष पुरवावे लागणार आहे.