संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील अपात्र ठरवण्यात आलेल्या ३२०० लाभार्थीचे अनुदान पूर्ववत सुरू करावे, दरमहा दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी कागल येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लाभार्थीनी तहसील कार्यालयावर भव्य लाटणे मोर्चा काढण्यात आला. या वेळी तीन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो हाणून पाडत असताना पोलीस व महिला लाभार्थ्यांमध्ये झटापट झाली. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा विसर्जति करण्यात आला.
कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ आदी योजनांतील लाभार्थीची महसूल अधिका-यांनी चौकशी केली. त्यामध्ये अपात्र ठरणा-या तीन हजार दोनशे लाभार्थीचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे तालुक्यातील अपात्र ठरलेल्या लाभार्थीचे आíथक कोंडी झाली असल्याने हा निर्णय बदलण्यात यावा, या मागणीसाठी लाभार्थीनी लाटणे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अपात्र ठरविणा-या महसूल अधिका-यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा गबी चौक, खरडेकर चौक, शिवाजीमहाराज पुतळा माग्रे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. मोर्चा राष्ट्रीय महामार्गावरून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. आंदोलकांचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी लाभार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना सुशीला जगताप, मंगल सोहोले, द्रौपदी हेगडे या महिलांनी अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन केल्याचा प्रकार केला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांनी हा प्रयत्न सुरू केल्यावर सभास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सभास्थळापासून बाहेर काढले.