रायगड जिल्हा परिषद निवडणुक

राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २१ फेब्रुवारीला रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यासाठी निवडणुक होणार आहे. नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्’ाात मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले होते. या पाश्र्वभुमीवर जिल्हा परिषदेत सत्तारुढ असणाऱ्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी समोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. जिल्’ाात स्वबळावर जिल्हा परिषद जिंकण्याची कुठल्याही पक्षात ताकद राहीलेली नाही. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांना जिल्हा परिषद निवडणुक युत्या आणि आघाडय़ांच्या माध्यमातून लढवावी लागणार आहे. जिल्’ाात शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे मोठे पक्ष आहेत. गेल्या दोन वर्षांत भाजपनेही जिल्ह्य़ात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुक आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसलापण सोबत घेण्याची रणनिती दोन्ही पक्षांनी आखली आहे. उत्तर रायगडातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापुर, सुधागड येथे शेकापची मोठी ताकद आहे. तर दक्षिण रायगडातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजपाची युतीबाबत बोलणी सुरु आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुक लढवण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र जागा वाटपावर युतीचा निर्णय अवलंबून असणार आहे. जिल्ह्य़ात पनवेल आणि उरणचा काही भाग वगळता भाजपची फारशी ताकद नाही. मात्र तरीही जादा जागांसाठी भाजप आग्रही आहे, सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर युती करणार नाही असे सांगत शिवसेनेची कोंडी करण्याचे धोरण सध्या भाजपने अवलंबले आहे.

अंतुले यांच्या निधनानंतर जिल्ह्य़ात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. मात्र तरीही अलिबाग, पेण, महाड तालुक्यात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. या निवडणुकीत पक्षाच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष्य असणार आहे. राज्यपातळीवर शेकाप आणि राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत जुळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असले, तरी अलिबाग आणि पेण तालुक्यात काँग्रेस पक्ष शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहे. तर महाड आणि पनवेल मध्ये काँग्रेसनेते शेकाप आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीच्या बाजूने आहेत त्यामुळे काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर सोयीस्कर भुमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी वाताहत झाली आहे. महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे यांच्या सारखे जिल्हा परिषदेतील जेष्ठ सदस्य पक्षाला सोडून शिवसेनेच्या कळपात सामिल झाले आहेत. रोहा आणि माणगाव तालुक्यातील

मतदारसंघाची संख्या घटल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत भर पडली आहे. रोहा आणि अलिबाग राष्ट्रवादी आणि शेकाप पारंपरिक विरोधी पक्ष असल्याने स्थानिक पातळीवर आघाडीबाबत नाराजी आहे. जिल्ह्य़ातील ९ तालुक्यात पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी या अडचणीच्या बाजू असणार आहेत. मात्र निवडणुकीच्या पाश्र्वभुमिवर तटकरे कुटुंबाचे मनोमिलन पक्षासाठी दिलासा दायक आहे.

पनवेलचा ग्रामिण भाग हा शेकापचा बालेकिल्या म्हणून ओळखला जातो. पक्षाचे सर्वाधिक जिल्हापरिषद सदस्य या तालुक्यातून निवडून येतात हा आजवरचा इतिहास आहे. मात्र तालुक्यातील २९ गावांचा आता पनवेल महानगर पालिकेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची संख्या घटली आहे. शेकापसाठी हि चिंतेची बाब आहे. पनवेल आणि उरणमध्ये भाजपचे वाढणारे प्रस्त पक्षासाठी घातक आहे. अशातच शिवसेना भाजप आणि स्थानिक पातळीवर काँग्रेस अशी महाआघाडी करून अलिबाग, पेण आणि मुरुड तालुक्यात शेकापची कोंडी करण्याची रणनिती सेनाभाजने आखली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शेकापला जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व कायम राखण्याचे कडवे आव्हान निवडणुकीच्या निमित्ताने असणार आहे.