‘सांगली-सातारा’ निवडणूक

विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला. काँग्रेससाठी हा विजय निश्चितच मोठा असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजीची खदखद या निकालातून स्पष्ट झाल्याचे म्हणावे लागत आहे. बालेकिल्ल्यातच मोठय़ा प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी गद्दारी करून पक्षाचा उमेदवार पराभूत करीत असतील तर राष्ट्रवादीसाठी निश्चितच धोक्याची घंटा राहणार आहे.

आजवर अशा राजकारणात सातत्याने राष्ट्रवादीचा ‘जय हो’ होत आला असताना, घरच्या मैदानावर या निकालाने पवार ‘पॉवर’ला मिळालेला दणका राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहज विजयाचे संख्याबळ असताना, राष्ट्रवादीकडून ही आमदारकी हिसकावण्याचे काँग्रेसचे धाडस फळास गेले आहे. त्यात वसंतदादांच्या कुटुंबानेही औट घटकेला काँग्रेस उमेदवाराशी जुळवून घेण्याची घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. डॉ. पतंगराव कदम व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत पुढे आले. पण, पडद्याआडचे सूत्रधार राष्ट्रवादीच्या गोटातीलच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मोहनरावांना निवडून आणण्याचा शब्द काही दिग्गजांनी दिल्यानेच मोहनरावांची थेट उमेदवारीच जाहीर झाली. खरे पाहता आघाडीच्या धर्मानुसार इथे ही जागा राष्ट्रवादीकडे असताना, काँग्रेसने त्यावर दावा करून, बहुमत नसतानाही विजय प्राप्त केला.

दरम्यान, महादेव जानकर यांच्या ‘रासप’चे माण-खटाव विधानसभा मतदार संघातील सक्षम उमेदवार शेखर गोरे यांना राष्ट्रवादीमध्ये सामील करून घेत त्यांना उमेदवारीही बहाल केल्याने अजितदादांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आले. पण, राष्ट्रवादीत एकमताचे चित्र दिसताना पडद्याआड मात्र आलबेल घडले. लादलेल्या उमेदवारी विरोधात खदखद व्यक्त करण्यात संबंधित नेत्यांनी कसर केली नाही.

राष्ट्रवादीच्या नशिबी नामुष्कीजनक पराभव आला. शरद पवार यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष न घातल्यानेच राष्ट्रवादीवर ही वेळ आल्याचेही मानले जात आहे. साम, दाम, दंडाच्या समीकरणात दोन्ही उमेदवार ‘तुल्यबळ’ असताना आणि बहुमताच्या संधीतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव विशेषत: अजित पवारांना घरभेद्यांनी चपराक दिल्यासारखा राहिला आहे.

दुसरीकडे या निवडणुकीत  ‘मराठा पॅटर्न’चा वापरही उघडपणे झाल्याची चर्चा आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीत अन्य जातीही जाग्या होत त्यांचे दबावाचे राजकारण करणार हे उघड आहे.