गटबाजीत प्रभाव ठेवण्यासाठी धडपड

राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीत आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र ‘आघाडय़ां’चे डाव खेळण्यास सुरू केल्याने प्रमुख चार नगरपालिकेत ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या स्पध्रेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटण्याची तयारी प्रमुख नेत्यांनीच चालवल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडू लागली आहे. तर पक्षनेतृत्वही निकालांच्या ताकदीवरच नेत्यांना स्थान देत असल्याने आघाडी व मित्रमंडळांना झेंडय़ानाच महत्त्व आले आहे.

बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतची गटबाजी पक्षनेतृत्वालाही नवीन नाही. मात्र, पक्षनेतृत्व स्थानिक पातळीवरच नेत्यांच्या गटबाजीला खतपाणी घालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.  बीड नगरपालिकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरुद्ध त्यांचेच बंधू रवींद्र क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना प्रतिष्ठान विकास आघाडी स्थापन करून दंड थोपटले आहेत. पक्षाचे विधिमंडळातील उपगटनेते जयदत्त क्षीरसागर यांचे दोन बंधूच एकमेकांविरुद्ध उभे राहत असल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडत असली तरी पक्षनेतृत्व मात्र कोणताही गट निवडून आला तरी आपल्याच पक्षाचा या भूमिकेत असल्याचे दिसते. गेवराईत पक्षाचे माजी मंत्री बदामराव पंडित व विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित या काका-पुतण्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. या पाश्र्वभूमीवर बदामराव पंडित यांनी मित्रमंडळाच्या पाटीखाली आपला स्वतंत्र गट कार्यरत ठेवला आहे. नगरपालिकेतही मित्रमंडळाच्या माध्यमातूनच निवडणुकीच्या मदानात उतरण्याची तयारी सुरू आहे. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या पाटीखाली आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत याच पाटीखाली बीड नगरपालिकेत निवडणुकीची तयारी चालवली आहे. दुसरीकडे माजलगाव मतदारसंघातील छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहन जगताप यांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या विरुद्ध दंड थोपटत नगरपालिकेत पक्षाच्या निष्ठावंतांना न्याय मिळत नाही, असे आरोप करत जनविकास आघाडी उभारली आहे. राष्ट्रवादीअंतर्गत स्थानिक पातळीवरील गटबाजीत आपले स्थान भक्कम करण्यासाठी नेत्यांनी पालिका निवडणुकीत राजकीय ताकद अजमावण्यासाठी स्वतंत्र आघाडय़ांचा डाव मांडला आहे.