भाजपबरोबर युती करण्याची राष्ट्रवादीची इच्छा नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इचलकरंजी येथे बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक जांभळे यांच्या एकसष्टीनिमित्त सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.  जांभळे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. तर आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास सर्व पक्षीय प्रमुख उपस्थित असताना या वेळी तटकरे म्हणाले, राजकारणात स्पर्धा निकोप असावी. राजकीय स्तरावर वेगळेपण जपले तरी त्यामध्ये नतिकता असणे आवश्यक आहे. राजकारणाच्या पलिकडे मत्री असलेला धागा अशोक जांभळे यांच्यापासून शिकला पाहिजे. जांभळे हे समाजकारण आणि राजकारणातील किमयागार आहेत.

नव्या राजकीय समीकरणांची मांडणी करताना भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, राज्यस्तरावर सध्या निजामाचं युद्ध, शोलेची लढाई असे चालले आहे. त्या दृष्टीने भविष्यात भाजपा-राष्ट्रवादी एकत्रित आल्यास जांभळे यांना प्रदेश राजकारणात संधी मिळेल. हाळवणकर यांचा हा मुद्दा पकडीत तटकरे यांनी, आमचा पक्ष शाहू-फुले-आंबेडकर यांचा समतेचा विचार जपणारा पक्ष आहे. तुमच्याबरोबर युती करण्याची आमची इच्छा नाही. त्यांचे काय व्हायचे ते होवो, असा टोला लगावत भाजपचा प्रस्ताव फेटाळला .

प्रास्ताविक माजी खासदार निवेदिता माने यांनी केले. या वेळी खासदार धनंजय महाडीक, आमदार मुश्रीफ, आमदार, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा  शुभांगी बिरंजे, िहदुराव शेळके, अशोक स्वामी, नितीन जांभळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना जांभळे यांनी सामाजिक, राजकीय जीवनात कार्य करताना स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांचे पाठबळ मोलाचे ठरले. स्तुती करण्याएवढा मी मोठा नाही, तरीही सर्वानी मिळून केलेला हा माझा गौरव अविस्मरणीय असल्याचे सांगितले.