राज्यात बिकट बनलेल्या तुरीच्या प्रश्नाबाबत नियोजन चुकल्याची मंत्री स्वतः कबुली देत आहेत. यापार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूरात देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकर्‍यांचे हाल होत असताना नियोजन चुकल्याची कबुली देण्यापेक्षा राजीनामे द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

तुरीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंडे यांनी मंगळवारी परळी तालुक्यातील टोकवाडी येथील नाफेडच्या तुर खरेदी केंद्रास भेट दिली. याठिकाणी तुर खरेदी विना पडून असल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

आठ दिवसांपासुन तुर पडुन आहे, बारदाना उपलब्ध नाही, ठेवायला जागा नाही, रात्र-रात्र उघड्यावर तुर सांभाळण्यासाठी दिवसा उन्हात बसावे लागते, अशा अडचणी यावेळी शेतकर्‍यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. जास्त उत्पादन झाले हा आमचा गुन्हा आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

तुरीच्या प्रश्नावर मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून तुरीचा प्रश्न सोडवण्याची व सर्व तुर खरेदी करण्याची मागणी केली आहे.’ तुरीच्या नियोजनाबाबत चूक झाल्याचे मंत्री सांगत आहेत. मात्र नियोजन करता येत नसेल तर राजीनामे द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच शेवटच्या शेतकर्‍याची तुर खरेदी होणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

बीबीतुरडाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात अजित पवारांनी संघर्ष यात्रेत सरकारवर निशाणा साधला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तुरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे, हा दाखला देत सरकारने चुकी मान्य केल्यानंतर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.