राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि तासगावचे सुपूत्र आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवार दुपारी त्यांच्या मूळगावी अंजनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आबांच्या अंजनीतील निवासस्थानापासून १ किमी. अंतरावर असलेल्या हेलिपॅड मैदानात शोकाकूल वातावरणात पंचक्रोशीतून आलेल्या आबांच्या लाखो चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. आबांचा मुलगा मोहित याने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांना अश्रु अनावर झाले. ‘आर.आर.पाटील अमर रहे…’च्या घोषणा सुरू होत्या आणि साश्रूनयनांनी ‘आपल्या माणसाला’ अंजलीकरांनी अखेरचा निरोप दिला.
तत्पूर्वी, सकाळपासून अंजनीसह संपूर्ण तासगाववर शोककळा पसरल्याचे चित्र असून सर्वपक्षीय नेते आबांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील असे राष्ट्रवादीचे सर्व नेते अंत्यविधीसाठी उपस्थित होते. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे देखील हजर होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील अंजनीत आबांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. राज्यातील जनसामन्यांचा आधार गेला असल्याची भावना यावेळी अण्णांनी व्यक्त केली. तसेच आर.आर.पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी  यावेळी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर नेते देखील आबांच्या अंत्यदर्शनासाठी अंजनीतील हेलिपॅड मैदानात उपस्थित होते. आबांवर मनापासून प्रेम करणाऱ्या जनतेने येथील बाजारपेठा आणि अन्य व्यवहार उत्स्फुर्तपणे बंद ठेवले आहेत.