मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात येईल, असे युतीतीलच एका नेत्याने मला सांगितल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये सांगितले. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी शेती, कर्जमाफी, वेगळ्या विदर्भासह विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, वेगळ्या विदर्भाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका यापूर्वी स्पष्टपणे मांडली आहे. आमदार असताना त्यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. त्याचवेळी शिवसेनेने महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, याला पहिल्यापासून पाठिंबा दिला पाहिजे. विधीनिषेध न बाळगता बोलणाऱयांची आणि लिहिणाऱयांची शिवसेनेमध्ये कमतरता नाही. त्यामुळे ते विदर्भाच्या मुद्दयावरून भाजपवर टीका करीत आहेत.
जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे, असे सांगत शरद पवार यांनी ते चांगले नसल्याचे मत मांडले आहे. पाणी हाच राज्य सरकारसाठी प्राधान्यक्रम असला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘यूपीए-१’च्या काळात शेतकऱयांना कर्जमाफी दिल्यामुळेच अनेक शेतकऱयांना त्यानंतर बॅंकांकडून कर्ज मिळू लागली. याचा शेतकऱयांना फायदाच झाल्याचे त्यांनी सांगितले.