उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांना कर्जत येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांना बुधवारी सकाळीच अटक करण्यात आली होती. सहा दिवसांपूर्वी लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण त्यांना अटक झालेली नव्हती.
कर्जत तालुक्यात सध्या रिलायन्स कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेष म्हणजे गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत. या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आमदार लाड करत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलावून यावेळी रिलायन्स गॅसपाइप लाइनसाठी शासनाने नेमलेले उपजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी  शेतकऱ्यांच्या सातबारावर कंपनीचे नाव चढवत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आमदार लाड यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी काही व्यक्तींनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. दरम्यान लाड यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन रिलायन्स पाइप लाइनविरोधात यापुढेही लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
कलगुटकर मारहाणप्रकरणी गेल्या शनिवारी संपूर्ण कोकणातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. महसूल विभागातील सर्वच कर्मचारी संघटना यात सक्रिय सहभागी होत्या. त्यातच रायगड जिल्ह्य़ातील तलाठी ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचे सर्व जण मिळून दीड हजार अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.