विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादीची बंडखोरी टाळण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीत असंतुष्टांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजकीय डावपेचानेच परतीचे दोर कापले असल्याचे सांगत सलोख्याला नकार दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील यांच्या वसंत बंगल्यावर ग्रामविकासमंत्र्यांच्या सोबत स्न्ोहभोजनास जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे, सांगलीचे दिनकर पाटील यांनी हजेरी लावली. तर विटय़ाचे अनिल बाबर विलंबाने उपस्थित राहिले.
राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले जतचे विलासराव जगताप आणि कवठय़ाचे घोरपडे यांची समजूत घालण्यासाठी आणि संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी गुप्त बठकीचे आयोजन केले होते. या बठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे हेही उपस्थित होते. श्री. पाटील यांनी असंतुष्टांना पक्षत्याग न करता सक्रिय होण्याची विनंती केली. मात्र उभयतांनी ही विनंती मान्य करता येत नसल्याचे सांगत गृहमंत्री आर.आर.पाटील हेच गटबाजीचे राजकारण करीत मतदार संघ विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला. गृहमत्र्यांच्या राजकारणाला कंटाळून आपण या निर्णयाप्रत आल्याचे सांगून आता परतीचे दोर कापले आहेत. त्यामुळे सलोखा अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक निकालानंतर खा. संजयकाका पाटील यांच्या छायाचित्रासह सांगली शहरात डिजिटल फलक लावणारे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील हे सुद्धा या बठकीस उपस्थित होते. या शिवाय पुणे पदवीधर मतदार संघातून बंडखोरी करणारे अरुण लाड, आटपाडीतील नाराज नेते रामभाऊ पाटील हे सुद्धा बठकीस उपस्थित होते. खानापूर-आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांनाही या स्नेहभोजनास आमंत्रित करण्यात आले होते मात्र ते विलंबाने वसंत बंगल्यात आल्याने त्यांची व जयंत पाटील यांची भेट होऊ शकली नाही.