महायुती आणि आघाडीच्या फाटाफुटीनंतर प्रथमच स्वतंत्रपणे लढल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जनाधाराची परीक्षा घेतली गेली, त्यात जिल्ह्यातून ३२.७२ टक्के मते मिळवून भाजप अव्वल आला आहे. काँग्रेसला २३.२० टक्के मतांचा आधार मिळाला आहे, राष्ट्रवादी आणि बसपचा जनाधार जवळपास सारखाच साडेसात टक्के आहे. शिवसेनेचा खासदार असूनही शिवसेनेला केवळ ११.२३ टक्के मते मिळाली आहेत.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानातून शिवसेनेचा जनाधार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती, अचलपूर, मेळघाट, तिवसा, बडनेरा आणि दर्यापूर या सहा मतदारसंघांपैकी मेळघाटचा अपवाद वगळता इतर सर्व मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना मताधिक्य मिळाले होते. पण, लगेच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र दिसून आले आहे. आनंदराव अडसूळ यांचे सुपूत्र अभिजीत अडसूळ हे पुन्हा दर्यापूर मतदारसंघातून भवितव्य आजमावण्यासाठी उभे होते, पण त्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात भाजपने मोठी झेप घेतली. भाजपने प्रथमच या मतदारसंघातून उमेदवार उभा केला होता. भाजपला या ठिकाणी मतदारांनी पहिली पसंती दिली. बसपचा जनाधार मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची बाब यावेळी लक्षवेधी ठरली आहे. एरवी २ ते ४ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी गाठणाऱ्या बसपला जिल्ह्यातील आठही मतदारसंघात एकूण ७.३२ टक्के मिळाली आहेत. तर काँग्रेसापासून विलग होऊन लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७.७७ टक्के मतांचे दान मिळाले आहे. त्यातही दोन मतदारसंघांमध्ये पाच अंकी मतांचा आकडा गाठता आल्याने राष्ट्रवादीला हे प्रमाण वाढवता आले आहे. राष्ट्रवादीचे मेळघाटचे उमेदवार राजकुमार पटेल आणि मोर्शीचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांना अनुक्रमे ५५ हजार२३ आणि ३१ हजार ४४९ मते मिळाल्याने हे प्रमाण वाढवण्यास मदत झाली. चार मतदारसंघांमध्ये तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाच अंकी संख्यादेखील गाठता आलेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. चार जागा जिंकणाऱ्या भाजपला ३२.७२ टक्के मते मिळाली आहेत. दोन जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला २३.२० टक्के मते आहेत. त्यातही भाजपचे अमरावतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांनी ८४ हजार ३३ मते मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवण्याची कामगिरी केली आहे.  अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विजयाची हॅटट्रिक साजरी केली असताना त्यांना ३३.०२ टक्के मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार बनसोड यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. जातीय मतविभागणीचा धोका समोर दिसत असूनही त्यांना विजयासाठी आवश्यक मते मिळाली. दुसरीकडे, बडनेराचे अपक्ष उमेदवार रवी राणा पुन्हा निवडून आले असले, तरी चौरंगी लढतीत त्यांचा जनाधार घटल्याचे स्पष्ट झाले. त्यांना या निवडणुकीत २६.१० टक्के मते मिळाली आहेत. रवी राणा यांना राष्ट्रवादीने समर्थन दिले होते.