नगर पंचायत निवडणूक
माजी मुख्यमंत्री तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासमोर विरोधी पक्षांनी आव्हान उभे करून कणकवली नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप शहर विकास आघाडी बनविली आहे. या निवडणुकीत गेल्या दहा वर्षांत सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसी सत्ताधाऱ्यांनी कणकवली शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. सर्व सत्तास्थाने राणे यांच्याकडे असूनही कणकवली शहराचा विकास रोखण्याबाबतची चर्चा या निवडणुकीत होत आहे.
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे निवासस्थान कणकवली शहरातच आहे. त्याशिवाय माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली, तसेच युवा नेते संदेश पारकर व विद्यमान आमदार प्रमोद जठार हे सारे जण कणकवलीकर असल्याचे स्वाभिमानी बाण्याने सांगतात पण कणकवली शहराच्या विकासाला मात्र ग्रहण लागल्याचे नमूद करावे लागेल.
सावंतवाडी शहर हे राजकीय व सांस्कृतिकदृष्टय़ा जिल्ह्य़ात आघाडीवर होते, पण राणे यांच्या गेल्या २५ वर्षांच्या सत्तास्थानामुळे कणकवली राजकीयदृष्टय़ा आघाडीवर असल्याने ओळखले जाते, राणे राज्याचे नेते आहेत, पण त्यांच्या गल्लीतील नेत्यांनी कणकवली शहराचा विकास झपाटय़ाने होण्यासाठी लक्ष दिले नसल्याची चर्चा आहे.
कणकवली नगर पंचायत निवडणुकीत सावंतवाडी नगर परिषद विकासाबाबत चर्चा आहे. सावंतवाडी शहरात शांतता राखण्यास जनतेचे सहकार्य मिळाले असल्याने विकास करणे शक्य झाले, पण कणकवलीची शांतता सर्वानाच ज्ञात आहे. या शांततेविषयी वेगळे काही सांगण्याची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी करून सावंतवाडी शहराच्या विकासाचा आदर्श राज्यात चर्चिला जात आहे, असा टोलाही हाणला आहे.
कणकवली नगर पंचायत निवडणुकीत सत्ता कोणाची येणार, या मुद्दय़ापेक्षा कणकवली विकास रोखण्यास कोण कोण जबाबदार आहे याची कारणे शोधली पाहिजेत. राणे यांच्याशी २५ वर्षे झुंज देणारे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेस प्रवेश करून सर्वानाच हादरा देत १७ जागांपैकी आपल्या दहा समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकले आहेत. राणे यांच्या एकाधिकारशाहीला धक् का देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते व मंत्री सहकार्य करीत नसल्याने राष्ट्रवादीची बाजू लंगडी पडत आहे, पण राणे यांना विरोध करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवून राष्ट्रवादीने पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपने कणकवली शहर विकास आघाडी करून काँग्रेसला आव्हान दिले आहे. या शहर विकास आघाडीला अभद्र मानून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
कणकवलीत गेल्या दहा वर्षांत प्रथम संदेश पारकर व गेल्या पाच वर्षांत काँग्रेस सत्तास्थानी आहे. राणे यांचे भक्कम पाठबळ मिळूनही कणकवलीचा हवा तसा विकास झाला नाही ही टीका या निवडणुकीत ऐकायला मिळाली आहे.
बोटिंग प्रकल्प अर्धवट असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याकडे कोणाला पाहायला वेळ नाही. कणकवली शहराचा झपाटय़ाने विकास होत असताना अद्ययावत भाजी व मच्छी मार्केट नाही, क्रीडा संकुल नाही, कचरा डेपो नाही किंवा कोंडवाडाही नाही, तसेच शहर झपाटय़ाने वाढत असताना वाहन पार्किंग व्यवस्था नाही. शिवाय नागरिकांना पायाभूत सुविधाही नाहीत, असे बोलले जात असून तशी टीकाही केली जात आहे.
काँग्रेसचे नेते म्हणून राणे यांचा दबदबा असताना अद्ययावत भाजी व मच्छी मार्केट उपलब्ध नाही, तसेच क्रीडांगणही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नसल्याने सावंतवाडी शहराच्या विकासाशी कणकवलीची तुलना करता येणार नाही, असा टोला राष्ट्रवादीने हाणला आहे.