स्वतंत्र सत्यपत्रिका जाहीर, कोणताही  प्रकल्प बंद करण्यास विरोध
श्वेतपत्रिका काढून सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचनावरची सत्यपत्रिका प्रकाशित करीत श्वेतपत्रिकेच्या मुळावरच घाव घातला आहे. आर्थिक पाहणी अहवालातील ०.१ टक्का सिंचनवाढीचा दावा ही प्रिंटिंग मिस्टेक  असल्याचा दावाही राष्ट्रवादीने आज केला. तसेच  सिंचन श्वेतपत्रिकेतील २५ टक्क्यांपर्यंतची कामे व उपसा सिंचन योजना बंद करण्याच्या प्रस्तावासही विरोध केला आहे. त्याचप्रमाणे अजित पवार हे राष्ट्रवादीचे शक्तिस्थळ असून त्यांच्यावरील हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाने दिला आहे.
सिंचन घोटाळ्यावरून गेले काही महिने अडचणीत सापडलेल्या अजित पवार यांची गुरुवारी राष्ट्रवादीने जोरदार पाठराखण केली. जलसंपदा विभागाने काढलेल्या श्वेतपत्रिकेच्या विरोधात विरोधी पक्षांनी काळी पत्रिका काढून सरकारचे दावे खोडून काढले. काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनीही बुधवारी पिवळी पत्रिका काढून श्वेतपत्रिकेतील दावे खोडून काढले. त्यातच या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या चार दिवसांपासून विधिमंडळात राष्ट्रवादीला, त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले आहे. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने आज सत्यपत्रिका जाहीर केली. आमदार शशिकांत शिंदे यांनी तयार केलेल्या या सत्यपत्रिकेचे प्रकाशन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. ‘सिंचनावर घाव कुटिल राजकीय डाव’ आणि ‘सत्यमेव जयते’ अशा दोन सत्यपत्रिका प्रकाशित करण्यात आल्या असून त्यातील एका पुस्तिकेत विरोधकांच्या राजकीय आरोपांना उत्तर, तर एका पत्रिकेत सिंचनाबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही सत्यपत्रिका प्रकाशित करताना पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे मुळ श्वेतपत्रिकेलाच छेद गेला आहे. सरकारच्या श्वेतपत्रिकेत ज्या प्रकल्पांची कामे २५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहेत ते प्रकल्प बंद करण्याचे तसेच उपसा सिंचन प्रकल्पही बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांना ब्रेक लागणार आहे. जलसंपदा विभागाने ही श्वेतपत्रिका तयार केली असली तरी राष्ट्रवादीने सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे.      
चर्चेचा दुष्काळ, सिंचनावरील पत्रिकांचा सुकाळ
 हिवाळी अधिवेशनात सिंचनावरील पत्रिकांचे युद्ध चांगलेच रंगले आहे. या घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा देण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढली. त्यात अनेक दावे करण्यात आले. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी काळी पत्रिका काढून सिंचन श्वेतपत्रिकेमुळे विदर्भावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला आहे, तर या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज राष्ट्रवादीने सत्यपत्रिका काढली. लगोलग भाजपने पुन्हा एक अर्धसत्य पत्रिका काढली. त्यामुळे सिंचनावरून विधिमंडळात पत्रिकांचे सिंचन होत असले तरी त्यावर सभागृहात चर्चेचा मात्र दुष्काळच आहे.