राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची घोषणा

रायगड जिल्हा परिषद शेकापसोबत लढविण्याचे संकेत येत असतानाच राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुखमंत्री अजित पवार यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागातील सर्व निवडणुका राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढेल, असे जाहीर करुन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. ते रविवारी माणगाव येथे बोलत होते. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या दीपक केसरकर यांना शिवसेनेने मंत्रीपद दिले; पण शिवसेनेतून निवडून आलेल्या कोकणातील एकाही आमदाराला मंत्री केले नाही असे सांगतानाच आ. सुनील तटकरे ज्या ज्या वेळी मंत्रीपदावर होते त्या त्या वेळी राष्ट्रवादीने कोकणाला झुकते माप दिले. मात्र युती सरकारच्या काळात राज्याची पीछेहाट सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

रविवारी (दि.२४)  माणगावमधील गांधी मेमोरियल हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळेस विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. अनिल तटकरे, आ. सुरेश लाड, आ. निरंजन डावखरे, जी. प. अध्यक्ष सुरेश टोकरे, भास्कर विचारे, यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार यांनी भाजप सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी घात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

कोकणने शिवसेना मोठी केली मात्र बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या दीपक केसरकर यांना शिवसेनेने मंत्रीपद दिले; पण शिवसेनेतून निवडून आलेल्या कोकणातील एकाही आमदाराला मंत्री केले नाही, असेही त्यांनी यावेळेस निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्राचे  राज्यात कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी पक्षामध्ये एकवाक्यता नाही. राजकारणात मतभेद असू शकतात; परंतु हे मतभेद चव्हाटय़ावर आणण्याच्या सर्व मर्यादा पार झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आणण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

यावेळी  राष्ट्रवादीचे माणगाव तालुका अध्यक्ष बाबुराव भोनकर, राष्ट्रवादीचे नेते बापुसाहेब सोनगिरे, मुंबई उपाध्यक्ष भास्कर विचारे, महिला अध्यक्षा वैशाली पाटील, युवा नेते संताजी पवार, विजय मोरे, अल्ताफ धनसे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती गीता जाधव, रिवद्र नटे, उदय जवके, दर्शन विचारे, अनिकेत तटकरे, कोकण विभाग युवती संघटक आदिती तटकरे, माणगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, सर्व नगरसेवक, पंचायत समिती सभापती अलका केकाणे, माणगाव पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदि मान्यवरांसह सुमारे दहा हजार कार्यकत्रे या मेळाव्यास उपस्थित होते.