लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ता हाती आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपचे नेते सत्ता मिळाल्यावर मात्र आश्वासन विसरल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी जिल्ह्यात टोलमुक्त आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनीही शासनाच्या फसवेगिरीचा निषेध करण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पिंगळे यांनी येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित बैठकीत केले. सकाळी ११ ते दोन या वेळेत जिल्ह्य़ातील सर्व नाके टोलमुक्त करण्यात येणार असून या वेळेत नागरिकांनी टोल भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्यातील युती शासनाच्या धोरणांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत टीका करण्यात आली. शेतकरी व सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुढील काळात आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. टोलमुक्त आंदोलनानंतर युवा शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्ज, वीज देयक आणि विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे पिंगळे यांनी नमूद केले. बैठकीस शहराध्यक्ष छबू नागरे, सिद्धार्थ वनारसे, अ‍ॅड. शरद गायधनी आदी उपस्थित होते. प्रास्तविक जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पगार यांनी केले. आभार बागलाण तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी मानले.