नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सागरी जैवविविधता टिकून पर्यावरणपूरक पर्यटनपूरक पर्यटन निर्माण व्हावे याकरिता सागर किनारे स्वच्छ असले पाहिजेत. यूएनडीपी अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित निर्मल सागरी अभियानात स्थानिक सागरीकिनारी वसलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका प्रशासनाबरोबर स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मालवण तालुक्यातील चिवला बीच येथे राष्ट्रीय युवक दिन व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व निर्मल भारत अभियान सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे ई.रवींद्रन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. वाय. जाधव मालवण, देवगड, वेंगुर्ले, केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाचे दिल्ली येथील कार्यालयाचे प्रतिनिधी व अधिकारी, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे उपराष्ट्रीय समन्वयक श्रीनिवासन अय्यर, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सिंधुदुर्ग प्रकल्पाचे व्यवस्थापक शशी कुमार, वने आणि पर्यावरण विभागाचे राज्यस्तरीय अधिकारी नोडल ऑफिसर एन. वासुदेवन, किरणराज यादव, एस. के. खंडोरे, प्रमोद कृष्णांनाना, मालवण नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष महेश जावकर, दीपक पाटकर, राजेश तारी, सौ. खानोलकर, ममता वराडकर, सुधाकर पाटकर यासह नगरपरिषदेचे अधिकारी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १२१ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा एकाच वेळी एकाच दिवशी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील वेंगुर्ला, देवगड, मालवण तालुक्यातील समुद्रकाठी वसलेली २९ गावे यांचा या अभियानात समावेश करण्यात आलेला आहे. असा किनारा स्वच्छता कार्यक्रम एक दिवसाचा न करता सातत्य राखले पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहकार्य यामध्ये आवश्यक आहे. नागरिकांना या उपक्रमामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे.
दीपप्रज्वलन टोपीवाला हायस्कूलचा विद्यार्थी मंदार न्हिवेकर यांनी केले. या वेळी पिंगुळी येथील कळसूत्री बाहुली लोककलेचा विश्राम ठाकर कला आदिवासी कलाआंगण तर्फे कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी सागरी किनारा स्वच्छता विषयक आधारित संदेश प्लास्टिक वापर टाळा, कचरा कुंडीत टाका, स्वच्छता अभियानात सहभाग घ्या. याबाबत विविध संदेश देण्यात आले. या सागरी निर्मल अभियानाच्या निमित्ताने गुहागर येथील वाळू शिल्पकार अमोल सावंत यांनी अठरा बाय दहाचे सोळा तासांत तयार केलेले वाळू शिल्प आणि प्रकाशभाई केळसुकर यांचे विविध सागर जैवविविधता बचाव संदेश देणारे वॉल पेंटिंग पर्यटकांचे आकर्षण ठरले.
या वेळी उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष किनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्यातील शेवाळ, कागदी कचरा, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या यांचे वर्गीकरण करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थ यांचा सहभाग लाभला. जमा झालेल्या कचऱ्याचे १६ प्रकारे विभाजन करण्यात येणार आहे त्याची आकडेवारी जमा करण्यात येणार आहे. कुजणारा कचरा गांडूळखत व कंपोस्ट खत प्रकल्पाकरिता व प्लास्टिक री-सायकलकरिता पाठविण्यात येणार आहे. तसेच पुनर्वापराकरिता त्यातील प्लास्टिक व धातूच्या इतर वस्तूंचा वापर करण्यात येणार आहे.