द्राक्षबागांसाठी पावसामुळे नुकसान होणाऱ्या भरपाईचे निकष बदलण्याची तसेच फळपीक विमा योजना अधिक पादरर्शी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे राज्य अध्यक्ष अशोक गायकवाड आणि नाशिक विभाग अध्यक्ष कैलास भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मागील आठवडय़ात झालेल्या गारपिटीमुळे दिंडोरी आणि चांदवड तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी तळेगाव, सोनजांब, शिंदवड, वडनेरभैरव येथे आले असता त्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. शिंदवड येथे रतनगडाच्या पायथ्याशी आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी अशोक गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या. द्राक्षबागांच्या नुकसानीची तीव्रता कमी किंवा अधिक पाऊस असला तरी सारखीच असते. त्यामुळे भरपाईचे निकष द्राक्षबागांसाठी बदलण्यात यावेत. याशिवाय सध्या मंडळ स्तरावर असणारी हवामान केंद्रे ग्रामस्तरावर केल्यास शेतकऱ्यांना फायद्याची ठरतील. हवामानमापक यंत्राची संख्या वाढवून हवामान केंद्रातर्फे उपलब्ध होणारी माहिती रोज संकेतस्थळाव्दारे प्रसारित करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पीक विम्यानुसार सध्या विम्याचा हप्ता ५० टक्के शेतकरी, २५ टक्के राज्य सरकार आणि २५ टक्के केंद्र सरकार अशा पध्दतीचा आहे. त्याऐवजी तो २५ टक्के शेतकरी, २५ टक्के केंद्र सरकार आणि ५० टक्के राज्य शासन असा करण्यात यावा. वारंवार होणाऱ्या गारपिटीपासून बागांचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन बागांवर केल्यास नुकसान टळू शकेल. इतर अनेक देशांमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी लागणारे प्लास्टिक आयात करावे लागत असल्याने त्याचा खर्च एकरी सुमारे सहा लाख रुपयांपर्यंत आहे. हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यासाठी सार्वजनिक व खासगी भागीदारीतून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिल्यास योग्य होईल, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
 शिंदवड परिसरातील नुकसानग्रस्त
शिंदवड परिसरातील आनंदा बारकू बस्ते यांची साडेचार एकर द्राक्षबाग ऐन मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या वेळेस गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी खेडगावच्या इको बँक शाखेतून २५ लाख रुपयांचे कर्जही काढले आहे, तर कचरू काशिनाथ गाडे यांची सुमारे दीड एकर, लक्ष्मण शंकर गाडे यांची पावणेदोन एकर, यशवंत नारायण मोरे, रमेश यशवंत बरकले यांची एक एकर द्राक्षबाग होत्याची नव्हती झाली. गेल्या चार वर्षांपासून हा परिसर नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.