उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील परिसरात  वैद्यकीय महाविद्यालयासोबत विद्यापीठ तयार व्हावे व या विद्यापीठात इतरत्र न शिकवले जाणारे विषय शिकवावेत, असे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले. उदगीर येथील लाइफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी बोलताना चाकूरकर म्हणाले, एके काळी शाळेला परवानगी मिळत नसायची, परंतु सरकारने आता शिक्षणाचे धोरण अनुकूल केले आहे. सगळा बोजा सरकारवर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागत असल्याने सामान्यांनी पुढे येऊन जबाबदारी उचलावी. हीच अपेक्षा मला लाइफ केअरकडून आहे. जे इतर विद्यापीठात शिकवले जात नाही असे शिक्षण देणारे विद्यापीठ तयार करा, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, हा प्रकल्प उदगीरच्या वैभवात भर घालणारा असून ज्या जिद्दीने, परिश्रमाने तो उभारण्यात आला ते कौतुकास्पद आहे. आमदार दिलीपराव देशमुख, डॉ. अर्चनाताई पाटील, आमदार विक्रम काळे यांची या वेळी भाषणे झाली.
आजोबांना चिमटा
 जाहीर कार्यक्रमात माजी आमदार संभाजीराव पाटील यांनी आजोबांना चिमटा काढला. ते म्हणाले, अक्का लातूरचे खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर चाकूरकरांनी घरच्या प्रमाणे आदरातिथ्य केले. प्रत्येक अडीअडचणीला ते मदतीला धावून येत असत. माझ्या बहिणीचे लग्न जेव्हा दिल्लीत झाले, तेव्हाही चाकूरकर आले, पण रक्ताच्या नात्यातील मात्र कोणीही आले नाही. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री  शिवाजीराव पाटील हे या वेळी उपस्थित होते.