शेतीक्षेत्र चिंतेचे नसून चिंतनाचे आहे. शेतकऱ्यांनी मंत्र-तंत्र, कौशल्य, यंत्र व व्यवस्थापन या पंचसूत्रीचा वापर करून उत्पादकतेसह आर्थिक उत्पन्न वाढविले पाहिजे. शेतकरी आत्महत्येचे संशोधन करून त्यामागील खरे कारण शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी येथे केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त रब्बी मेळावा पार पडला. या वेळी डॉ. दांगट बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू होते. माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. बी. बी. भोसले, कृषी सहसंचालक के. एन. देशमुख, कुलसचिव डॉ. डी. एल. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी नवीन शेती तंत्रज्ञान स्वीकारून गुणवत्ता वाढविली पाहिजे. पारंपरिक शेतीसह नव्या तंत्रज्ञानाची कास धरून जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करून शेती करण्याची गरज आहे. मराठवाडा सुपीक प्रदेश असूनही या भागातील अनेक जिल्हे मागास आहेत, अशी खंत डॉ. दांगट यांनी व्यक्त केली. शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढत असून, त्या तुलनेत तरुण शेतीकडे येत नाहीत. शेतीमध्ये पंचसूत्रीचा वापर करावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, यावर नुसती चर्चा नको तर संशोधन करून त्यामागील खरे कारण शोधले पाहिजे व त्या संदर्भातील उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
खते, बियाणे, औषधी कंपन्यासाठी शेती उरली आहे. असे सांगून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर डॉ. देसरडा यांनी टीका केली. मराठवाडय़ातील जंगल नष्ट झाले. आगामी काळात शेतीही नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. कृषी विद्यापीठाने शेतीतील उदासीनता घालविण्यास प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. मायी यांनी केले. कोरडवाहू पिकांना अधिक दर मिळाला पाहिजे. मजूर टंचाईवर यांत्रिकीकरण हाच उपाय आहे. अन्नधान्य वाढले, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी विद्यापीठातील रिक्त जागा ६-७ महिन्यांत भरल्या जातील. त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.