बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असा विरोध करणाऱ्या एमआयएमचे मूळ शोधण्याची गरज महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे आणि मुंडे यांचे स्मारक महाराष्ट्रात उभारणाच याचा पुनरूच्चार करत एमआयएमला फारसे गांभिर्याने घेत नाही, असेही त्यांनी येथे सांगितले.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत खडसे यांनी बीटी कापूस बियाण्यांच्या किंमतीचाही मुद्दा मांडला. राज्यात बीटी कापूस बियाण्यांची एमआरपी १०० रुपयांनी कमी करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना काढम्यात आली आहे. बीटी बियाण्यांची विक्री करताना एमआरपी किंमत १०० रुपयांनी स्वत:हून कमी करावी अथवा दरात १० ते २० टक्के सवलत देऊन विक्री करण्याच्या राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला बियाणे उत्पादक व पणन कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संकरीत कापूस बियाण्यांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. बीटी बियाण्याची किंमत वाढविण्याची मागणी उत्पादकांकडून करण्यात येत होती. बी-बियाणे चढय़ा दराने विक्री केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल. राज्यात विविध कायद्याअंतर्गत कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेने एकूण ४० कंपन्यांची तपासणी करून ३०.२६ लाख बीटी बियाण्याची पाकिटे जप्त केली असून १४ विक्री परवाने निलंबित करून ४० परवाने रद्द केले आहेत. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असेही खडसे यांनी नमूद केले.