तडावळे ता. कोरेगाव येथील बलात्कार प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आरोपीवर पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करून सहा महिन्यांच्या आत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सातारा येथे केली.
तडावळे येथील पीडित मुलीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेल्या होत्या. या वेळी त्यांनी पीडितेची तसेच आई-वडिलांची चौकशी केली. या वेळी त्यांच्या बरोबर शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी तसेच पोलिस अधिकारी होते.
त्या पुढे म्हणाल्या, आरोपी हा कोडगा आहे. त्यावर आधीही अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जलदगती न्यायालयात हा खटला चालवून जास्तीजास्त कठोर शिक्षा द्यावी. तसेच ग्रामस्थांनीही झालेल्या घटनेची विनाकारण चर्चा करू नये या मुळे पीडितेच्या मनोधर्यावर परिणाम होईल असे त्या म्हणाल्या. मुलीचे समुपदेशन योग्यप्रकारे करण्याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली.
गावातील तरुण मुले कशा प्रकारे सुसंस्कृतपणे वागतील हेही पाहिले पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या, सातारकर शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा-विचार पुढे नेणारे आहेत.पीडित महिलांच्या खटल्याचे तातडीने निकाल लागावेत या साठी आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे आवश्यक आहे. तसेच पालकमंत्र्यांनी या मुद्दय़ावरील बठकीचा आढावा घ्यायचा आहे, असेही त्या म्हणाल्या.