वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता व प्रवेशपूर्व ‘नीट’ या परीक्षेसाठी औरंगाबाद पाठोपाठ नांदेड येथे एक परीक्षा केंद्र देण्याची घोषणा मंगळवारी सायंकाळी झाल्यानंतर या केंद्र मंजुरीचे श्रेय घेण्यावरुन संबंधितांत चढाओढ सुरू झाली आहे.

या परीक्षेसाठी आधी महाराष्ट्रात केवळ पाच परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि अन्य संबंधितांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्रात परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या आठवडय़ात देशभरात काही नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील नगर, अमरावती, कोल्हापूर व सातारा या चार परीक्षा केंद्रांचा समावेश होता; पण मराठवाडय़ात एकही नवे परीक्षा केंद्र जाहीर झाले नव्हते.

या पाश्र्वभूमीवर िहगोलीचे खासदार राजीव सातव यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासात नांदेड किंवा लातूर येथे ‘नीट’ चे परीक्षा केंद्र देण्याची मागणी आवश्यक त्या कारणांसह केली होती. त्याआधी खासदार सातव यांनी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्रही यासंदर्भात दिले होते. या पत्रावर खासदार अशोक चव्हाण व अन्य काही खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

सीबीएसई बोर्डाने मंगळवारी आणखी काही नव्या परीक्षा केंद्रांची नव्याने घोषणा केली. त्यात मराठवाडय़ात नांदेडसाठी एक परीक्षा केंद्र मंजूर झाल्याची बाब जाहीर होताच नांदेडमधील आयडियल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजीचे संचालक गणेश चौगुले यांनी सर्वप्रथम पत्रक काढून विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी कळविली. या विषयात प्रा. चौगुले मागील काही महिने सतत आघाडीवर होते. मुंबई व दिल्ली दरबारी जाऊन त्यांनी ही मागणी संबंधितांसमोर रेटली. नांदेड व दिल्ली येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे भाजपा कार्यकत्रे डॉ. महेश तळेगावकर हेही जावडेकर यांच्या सतत संपर्कात होते. नांदेडला परीक्षा केंद्र व्हावे, यासाठी ते अनेकांना भेटले असे सांगण्यात येते.

यापाठोपाठ राजकीय क्षेत्रांत काही मंडळींनी या बाबीचे श्रेय िहगोलीचे खासदार राजीव सातव यांना दिले आहे. बुधवारी सातव यांच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षांव झाल्यानंतर सामूहिक प्रयत्नांना यश आल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे नांदेड येथे ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी गेल्या शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाडय़ात आणखी एक परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली होती, याकडे लक्ष वेधण्यात आले. राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत पत्रकबाजी व दावे-प्रतिदावे सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या वतीनेही एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. त्यात केवळ अशोक चव्हाण यांच्यामुळेच नांदेड येथे ‘नीट’ परीक्षा केंद्र मिळाले असल्याचे नमूद करण्यात आले. नांदेडमधील काही जणांनीही चव्हाण यांना अभिनंदनाच्या जाहिरातीतून श्रेय दिले आहे. चव्हाण यांनी २७ डिसेंबरला महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले होते. त्यात नांदेड येथे एक परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली होती, याकडे काँग्रेसचे स्थानिक प्रवक्ते संतुका पांडागळे यांनीही लक्ष वेधले आहे. ‘नीट’ परीक्षा केंद्राच्या या श्रेयाच्या चढाओढीत सत्ताधारी पक्षाचे आमदार व पदाधिकारी अद्यापतरी समोर आलेले नाहीत.