नवीन शेतकरी संघटना काढण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या आहेत . बुधवारी त्यांनी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यात संपर्क अभियान राबवले. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळल्याचा दावा, खोत यांनी ‘ लोकसत्ता’शी बोलताना केला. नव्या संघटनेचे नाव सदस्य सुचवतील ते राहणार असून दसऱ्याचा मुहूर्त साधत राजकीय सीमोलंघन करण्याचा विचार आहे .

स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढीसाठी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी जीवापाड प्रयत्न केले . तथापि , या दोन मित्रांत अंतर आले असून अलीकडेच खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता खोत यांनी आपली स्वतंत्र शेतकरी संघटना सुरु करण्याचे ठरवले असून त्यासाठी संपर्क अभियान सुरु ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली भूमिका पटवून देण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे खासदार शेट्टी यांच्या लोकसभा मतदार संघातून त्यांनी याला सुरुवात केली आहे. शेट्टी यांना मताधिक्य मिळवून देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यात संपर्क अभियान राबवले. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळल्याचा दावा, खोत यांनी केला. आपल्या घरातूनच सुरुवात केलेली बरी, असे म्हणत त्यांनी आपले लक्ष्य कोणते असणार यावर टिपणी केली .

शेतकरी संघटना सुरु करताना काही नव्या घटकांना खोत यांनी जन्माला घालण्याचे ठरवले आहे. संघटनेत ना कोणाची चौकशी केली जाणार ना कोणाची हकालपट्टी केली जाणार आहे, असे सांगत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या अन्यायाला आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे ठरवले आहे. संघटनेसाठी आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्याला त्याने व्यतीत केलेला वेळ परत देऊ शकत नसाल तर तुम्हाला कोणाचीही हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी शेट्टी यांच्यावर निशाणा साधला.

मी शेतकरी संघटना स्थापन करणार असून ती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असेल . मी राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. कोणत्याही पक्षाची व्यक्ती माझ्या संघटनेचे काम करू शकते. निवडणूक काळात त्यांना त्यांची राजकीय भूमिका घेता येईल. निवडणूक संपली की त्यांना माझ्या संघटनेचे काम करण्याची मोकळीक राहील, असे सांगून खोत यांनी संघटनेचा विचार बोलून दाखवला. पहिल्या टप्प्यात मराठा आरक्षण संघर्ष समीतीचे अध्यक्ष आणि इचलकरंजीतील भाजपचे नेते सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे हे सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.