नवे महापौर अभिषेक कळमकर यांनी निवडीनंतर चार दिवसांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. महानगरपालिकेच्या वसुलीसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले, तसेच सध्या सुरू असलेली पाण्याची फेज-२, भुयारी गटार योजना व सावेडीतील प्रस्तावित नाटय़गृहाला चालना देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
महापौरपदाची निवडणूक गेल्या दि. ८ ला झाली. या विजयानंतर कळमकर यांनी शुक्रवारी सकाळीच हा पदभार स्वीकारला. आमदार संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त वालगुडे, मनपातील सभागृहनेते कुमार वाकळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, नगरसेवक समद खान, संजय घुले, स्वप्नील शिंदे, आरीफ खान, उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे आदी या वेळी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर कळमकर यांनी मनपाचे उत्पन्न वाढवणे हे आपले प्राधान्याचे काम राहील, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, स्थानिक विकास कर (एलबीटी) हा मनपाचा मुख्य आर्थिक स्रोत असून त्याची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतील त्रुटी दूर करून त्यातही मोठी वाढ करावी लागेल. मनपाची आर्थिक स्थिती सुधारणे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या महापौरपदाच्या काळात मनपाच्या रेंगाळलेल्या अनेक योजनांना चांगलीच गती दिली. ही कामे त्याच वेगाने सुरू ठेवून ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे कळमकर यांनी सांगितले. कोठी रस्ता, बालिकाश्रम रस्ता ही प्राधान्याची कामे असून पाइपलाइन रस्त्यावरील पूल, सावेडीतील नाटय़गृह आणि पाण्याची फेज-२ योजना यासाठी विशेष प्रयत्न करून आपल्या कारकीर्दीतच त्या पूर्ण करू, अशी ग्वाही कळमकर यांनी दिली.