शिवसेना आता आवळली असून सेनेत आता काही शिल्लक राहिले नसल्याचा दावा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग इथे पत्रकारांशी बोलत होते. रायगडातील पुढचा खासदार कॉँग्रेसचाच असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला कॉँग्रेस पक्षाने आतापासूनच सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसाठी पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने आज केवलसिंह धिलन यांना रायगड जिल्ह्य़ाचा दौरा करायला सांगितला होता. या वेळी उद्योगमंत्री नारायण राणे आवर्जून उपस्थित होते.  जिल्ह्य़ातील परिस्थितीचे अवलोकन करून संभाव्य उमेदवारांची चाचपणी या वेळी करण्यात आली. यात उमेदवार निवडीचे सर्व अधिकार बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना देण्याचा कल पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. तर मुश्ताक अंतुले, शाम सावंत, माणिक जगताप, रविशेठ पाटील आणि रामशेठ ठाकूर यांची नावेही या बैठकीत चर्चेत आली, असेही राणे यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनी जरी दीड लाख मतांची आघाडी घेतली होती, मात्र गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे. दुसरीकडे आता शिवसेना आवळत आली आहे आणि आता शिवसेनेत काहीही शिल्लक राहिले नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.  आगामी काळात रायगडचा खासदार हा काँग्रेसचाच असेल आणि या वेळी आमचा मित्र पक्ष चांगले सहकार्य करेल, असेही राणे यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता आवर्जून सांगितले. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार मधुकर ठाकूर, माजी आमदार शाम सावंत, मुश्ताक अंतुले, जिल्हाध्यक्ष आर. सी. ठाकूर, उपाध्यक्ष मही पाटील उपस्थित होते.