जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ही चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील लासलगांव, पिंपळगाव, सायखेडा, ओझर परिसरातील कांदा मार्केट यार्ड, शाळा-महाविद्यालय, विविध बाजारपेठा, मंगल कार्यालये या ठिकाणाहून दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले होते.

पोलिसांनी अशा प्रकारे विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद करत त्यांच्याकडून १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हेशाखेच्या वतीने यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. ज्या ठिकाणाहून दुचाकी चोरीस जात होती ती ठिकाणे, तसेच वाहने चोरी करणारे लोक व चोरी करण्याची पद्धत याचा अभ्यास करण्यात आला. या चोरलेल्या दुचाकी कमी किंमतीत नंबरप्लेट बदलून विकल्या जात असल्याची चाहूल पोलीसांना यावेळी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पोलिसांनी सापळा रचला. संशयित आकाश वाघ हा चोरीची दुचाकी घेऊन निफाड ते सायखेडा रोडने येणार असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गस्ती पथकाला सूचना दिल्या. निफाड येथील आकाश याला पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी आपला धाक दाखवताच त्याने खेरवाडी येथील महेश संगमनेरे (२०), दिनकर धारबळे (२३) याच्या मदतीने महिनाभरापुर्वी पाटोदा रस्त्यावरील वस्तीमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पथकाने खेरवाडी येथे जात महेश व दिनकरला ताब्यात घेतले असता त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. यात त्याने शुभम लांडगे (१९) व ॠषीकेश संगमनेरे(१८) या अन्य साथीदारांची नावेही उघड केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून ४ बजाज पल्सर, ४ हिरोहोंडा स्प्लेंडर, ७ स्प्लेंडर प्लस, १ स्पेंलडर प्रो, १ बजाज डिस्कव्हर, १ बजाज प्लॅटीना, १ होण्डा सीडी १०० अशा १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. असा अंदाजे २ लाख ४६ हजार रुपयांचा हा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला.
संशयितांकडून लासलगांव येथील दुचाकी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या १८ दुचाकी नंबर संशयितांनी बदलल्याने या दुचाकीच्या मुळ मालकांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहे. मोटार सायकल चेसिज नंबरबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, पोलीस अधिक्षक कार्यालय, आडगांव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.