काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने माजी खासदार नीलेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी नीलेश राणे यांना अटक होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला. दरम्यान, बुधवारी दुपारीच नारायण राणे यांनी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात जाऊन संदीप सावंत यांची विचारपूस केली होती. संदीप आमच्या घरचा कार्यकर्ता आहे. त्याला सर्वोतोपरी मदत करण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
नीलेश राणे, त्यांचा स्वीय सहायक तुषार व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात संदीप हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केला.