काँग्रेस पक्षाचे कोकण विभागीय प्रचारप्रमुख माजी खासदार नीलेश यांनी कामगार मंत्री भास्कर जाधव यांचा प्रचार न करण्याची भूमिका जाहीर करत पुन्हा एकवार जाधवविरोधाचा राग आळवला आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्र आणि जाधव यांच्यातील तिढा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी खासदार नीलेश यांनी गेल्या महिन्यात गुहागरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची भीमगर्जना केली होती; पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्याबाबत माघार घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्य़ासाठी काँग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून नीलेश यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी आघाडीचा धर्म न पाळल्याची तक्रार पुन्हा एकदा नीलेश यांनी करत त्यांच्या प्रचारात आपण सहभागी होणार नसल्याचे राणे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत जाधवांनी आपल्या विजयासाठी मदत केली नाही. प्रचारसभांनाही ते कायम गरहजर राहिले. त्यामुळे जाधव यांचा मतदारसंघ वगळता कोकणातील काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचार करणार असल्याचे नीलेश यांनी नमूद केले. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जाधव यांच्यात गेल्या सुमारे तीन वर्षांपासून राजकीय वैमनस्य आहे. त्यातच नीलेश यांच्या समर्थकांनी चिपळूण येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयाची मोठय़ा प्रमाणावर नासधूस केल्यामुळे राणे पिता-पुत्र आणि जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी चिघळला. मध्यंतरी जाधव यांच्याकडील गाजलेल्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावून समेटाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीतील नीलेश यांच्या पराभवामुळे ते पुन्हा गढुळले असून विधानसभा निवडणुकीत जाधवांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस आघाडीअंतर्गतच प्रयत्न केले जातील, असे चित्र दिसत आहे.