बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार धर्मनिरपेक्षतेच्या केवळ बाता करतात. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पोपट आहेत. तिसरी आघाडी हे पोकळ स्वप्न आहे. ममता बॅनर्जी, मुलायमसिंग यादव आणि नितीशकुमार हे तिघेही पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात असल्याने ही मंडळी एकत्र येणे शक्य नाही. लालकृष्ण अडवाणी असो किंवा नरेंद्र मोदी, त्यांना देशाशी काही घेणे देणे नसून त्यांची फक्त सत्तेसाठी धडपड सुरु आहे, अशा शब्दात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी एकाच वेळी अनेकांवर टीका केली.
बुधवारी त्र्यंबकेश्वर आणि शनि िशगणापूर येथील धार्मिक भेटीनंतर लालूप्रसाद यादव यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्यावरील राजकीय संकटे दूर व्हावीत यासाठी यादव यांनी साईंची प्रार्थना केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,‘‘अडवाणी जे सांगतात तेच नितीशकुमार बेालतात. खरे तर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी आणि नितीशकुमार हे एकमेकांचे पाय खेचण्यात गर्क आहेत.
या तिघांपैकी कुणीही पंतप्रधान होणे शक्य नाही. काँग्रेससह देशातील धर्मनिरपेक्ष पक्ष एकमेकांविरुध्द लढले तरी जातीय शक्तीला दूर ठेवण्यासाठी निवडणुकीनंतर माझ्यासह सर्व जण एकत्र येतील. बिहारमध्ये मी आता हंटर घेऊन चाललो आहे,’’ असा इशारा लालुप्रसाद यांनी दिला.
लालूप्रसाद म्हणाले,की लोकसभा निवडणूक जवळ आल्याने भाजपला सत्तेचे डोहाळे लागले आहेत. सत्तेवर बसण्यासाठीच त्यांची धडपड सुरु असल्याने हा वाद निर्माण झाला. ममता, मुलायम, नितीशकुमार हे तिसऱ्या आघाडीची स्वप्नं पाहात आहेत.
मात्र त्यांची आघाडी होणार नाही आणि झाली तरी या सर्वाचाच पंतप्रधानपदावर डोळा असल्याने हे सर्व नेते निवडणुकीनंतर निवडीची वेळ येईल त्यावेळी मात्र हे सर्व पुन्हा एकमेकांपासून दूर जातील. नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. देशाच्या पुढील राजकारणात मी रिंगमास्टरची भूमिका निभावणार आहे, मात्र आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही लालूप्रसाद यांनी स्पष्ट केले. खाद्य सुरक्षा विधायकालाही आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
लालूप्रसाद यांच्या समवेत पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मुले तेजप्रसाद, तेजस्वी व राजलक्ष्मी आदी कुटुंबीय होते. संस्थानच्या वतीने या सर्वाचा सत्कार करण्यात आला.