मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पािठबा दिला.
नागपूर हिवाळी अधिवेशनात नवीन सरकारला शुभेच्छा देण्यासाठी गडकरी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक योजनांचीही माहिती दिली. चीनमध्ये 44 टक्के जलवाहतुकीचे प्रमाण असताना देशात जलवाहतूक 3 टक्के तर प्रवासी वाहतूक केवळ 0.3 टक्के होते. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान कॅटमरान सेवा सुरु केली जाईल. रस्त्यावर व पाण्यातही चालविता येईल, अशी अत्याधुनिक बसही मुंबईत आणली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.
बायोडिझेलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी चालना दिली जाईल आणि त्यावर चालणारी देशातील पहिली हरित बस नागपूरमध्ये लवकरच आणली जाईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.