केंद्र पातळीवर परिवहन विभागाशी संबंधित असलेल्या योजना आणि त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.
रामटेक आणि सावरनेर तालुक्यातील खुर्सापार येथे सीमा तपासणी दौरा आटोपल्यानंतर दिवाकर रावते यांनी महालातील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर निवडणुकीपूर्वी भाजपापासून वेगळी झालेली शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन खाते देण्यात आले आहे. केंद्रात परिवहन खाते नितीन गडकरी यांच्याकडे त्या संदर्भात केंद्राच्या ज्या योजना आहे त्या राज्यात राबविण्यासंदर्भात गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली. विशेषत देशात प्रथमच नागपूर महापालिकेच्या माध्यमातून इथेनॉलवर चालणारी ग्रीन बस प्रायोगित तत्वावर नागपुरात सुरू केली आहे. ही बस राज्यात विविध जिल्ह्य़ात सुरू करण्यासंदर्भात गडकरी यांची रावतेंशी चर्चा केली.
यावेळी दिवाकर रावते यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले, नितीन गडकरी युतीचे ज्येष्ठ नेते असले तरी केंद्राचे परिवहन मंत्री आहेत. त्यामुळे या विभागातील काही योजनासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातील तोटय़ात असलेली परिवहन सेवा चांगल्या स्थितीत कशी आणता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीत फारशी चर्चा करण्यात आली नाही. या विभागाचे काम समजून घेतल्यानंतरच राज्यात नागरिकांच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. इथेनॉलवर चालणारी ग्रीन बस केवळ नागपुरात प्रयोगिक तत्वावर सुरू आहे. केंद्राची ती योजना असल्यामुळे राज्यात ती सुरू करावी की नाही, या संदर्भात गडकरी निर्णय घेतील आणि तसे आदेश राज्य सरकारला देतील. परिवहन विभागाशी संबंधित चांगल्या योजना राबविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. स्टार बसचा प्रश्न नागपूर महापालिकेचा आहे. त्यामुळे तिला चांगल्या स्थितीत कशी आणावी ते महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी ठरवतील.
आम्हाला महत्वाचीच खाती
राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडे कमी दर्जाची खाती असल्याचे केवळ प्रसार माध्यमातून ऐकले आहे. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेच्या एकाही नेता या संदर्भात विधान केलेले नाही. उद्योग, आरोग्य, परिवहन, एमएसआरडीसी ही सर्वच खाती आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे रावते म्हणाले.