पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांसाठीचे असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जनतेच्या विकासाला खीळ घालण्यासाठीच काँग्रेस दिशाभूल करून प्रकल्पांना व सुधारणांना विरोध करीत आहे. केंद्र सरकारवर ‘सुटाबुटातील सरकार’ अशी टीका करणाऱ्या काँग्रेसने कोळसा खाणींचे वाटप काय दारिद्र  रेषेखालील नागरिकांना किंवा अल्प भूधारक शेतकऱ्यांना केले होते का, असा सवाल उपस्थित करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. प्रस्तावित भूसंपादन कायद्यातील तरतुदी या देशहिताचा विचार करून आणि विकासाला चालना देण्यासाठीच असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या राज्य परिषदेच्या समारोपानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना गडकरी यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे आणि सरकारने सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती काय होती, याचे विवेचन केले.
सिंचन वाढविल्याने मध्य प्रदेश, गुजरात यांचा विकासदर वाढला. सिंचन प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अधिक पिके घेता येतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.  मुंबई-दिल्ली औद्योगिक विभागासारखे प्रकल्प राबविल्याने गावागावांत रोजगार निर्माण होईल.
शहरांकडे धाव न घेता तरुणांना गावातच रोजगार मिळावा, तेथे उद्योग उभारणी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रस्ते आणि ग्रामीण व नागरी भागात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी जमिनी हव्या आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी जमीन हवी आहे. हे विचारात घेऊन यासर्व प्रकल्पांचा अपवाद केला आणि त्यांच्यासाठी ८० टक्के शेतकऱ्यांच्या सहमतीची अट आणि सामाजिक परिणाम अभ्यास करण्याची अट काढून टाकली आहे. हे प्रकल्प होणे हे  सर्वसामान्यांच्या हितासाठी व विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. सरकारवर टीकास्त्र सोडून आणि जनतेमध्ये भ्रम निर्माण करून विकास रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे मोदी सरकारने काम केले नाही, असे जनतेपुढे मांडून पाच वर्षांनी मते मागता येतील, असा डाव असल्याचा आरोप गडकरी यांनी केला. ही विकृत मानसिकता आहे. विकासाला विरोध करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांना परदेशातून निधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘हेडलाइन’ ही ‘डेडलाइन’ नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर हल्ला चढवीत केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीचे विस्तृत विवेचन केले. आधीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. जनतेचे सेवक असल्याची आमची भावना असून आम्ही सत्तेचे दलाल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेपुढे नतमस्तक झाले होते. जनसेवेच्या माध्यमातून आम्ही राज्य करीत असून सत्ता उपभोगण्यासाठी नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रसिद्धीमाध्यमातून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. वृत्तपत्रांची हेडलाइन ही आपल्यासाठी डेडलाइन होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
खास पाहुणचार
झणझणीत कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, राजाभाऊंची भेळ असा खास कोल्हापुरी ढंगातील रसास्वाद चाखतानाच राज्यभरातून आलेल्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी, रंकाळा तलावाला भेट दिली. प्रदेश भाजपच्या वतीने प्रतिनिधींना कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी गूळ अधिवेशन स्थळीच भेट देण्यात आले.