शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधात असताना आम्हीही करीतच होतो, यापूर्वी कर्ज माफी झाली, पण त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत विदर्भात ५० टक्के सिंचन होत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, राज्य सरकारने शेतीला पुरक अशी कामे सुरू केली आहे, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने या काळात केलेल्या विकास कामाची माहिती त्यांनी दिली. कालवे आणि तलावातून जोपर्यंत शेतीला पाणी उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेती आणि रोजगाराच्या दृष्टीने विदर्भात अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. गडचिरोलीमध्ये उदबत्तीच्या काडय़ा तयार करण्याचे काम केले जात असून त्यातून पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात मध गोळा करुन निर्यात करण्यात येणार आहे. एका विदेशी कंपनीची ६०० टनची मागणी आहे. त्यातून विदर्भातील अनेक लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमध्ये वेसबर्न कंपनीचे हातमाग क्षेत्रात मोठे काम आहे. पाचगाव, कामठी, मोमीनपुरा या भागात या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कंपनीचे अधिकारी नागपुरातच येऊन गेले असून त्यांनी जागा बघितल्या आहे. मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्र येत्या वर्षभरात सुरू केले जाणार आहे. त्या संदर्भात निविदा निघाल्या असल्याचे गडकरी म्हणाले.

सरकारने तीन वर्षांत पाच लाख लोकांना वीज पंपाचे कनेक्शन दिले आणि येत्या दोन वर्षांत आणखी ५ लाख शेतक ऱ्यांना दिले जाणार आहे. वन विभागाच्यामार्फत झुडपी जंगल क्षेत्रात विविध प्रकारचे गवत लावले जाणार आहे. एका एकरातून २५० किलो गवत उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्धा एकर परिसरात गवत लावावे त्यापासून गायीच्या दूधामध्ये वाढ होईल.

नागनदी सौंदर्यीकरणाची १२०० कोटीचा योजना असून जायकाला त्याचे काम देण्यात आले आहे. कांडलाच्या धर्तीवर चिटणीस पार्क आणि यशवंत स्टेडियम विकसित केले जाईल. संबंधित कंत्राटदाराला नागपुरात आमंत्रित करण्यात आले आहे. मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब खापरीला तयार केले जाणार आहे. लंडन स्ट्रीटचे कामे लवकरच सुरू होणार आहे. धंतोली आणि रामदासपेठ या भागातील हॉस्पिटल त्या ठिकाणी नेण्यात यावे आणि त्यांना स्वस्तात जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दारुचे दुकान सुरू करण्यासाठी शहरातील महामार्ग महापालिकेकडे हस्तातरित करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची साठवणुकीच्या संदर्भात विदर्भ आणि मराठवाडय़ात सात रबर डॅम्प तयार केले जाणार आहे. एका कोरियन कंपनीसोबत त्या संदर्भात करार झाला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

विदर्भात दुग्ध उत्पादनाला चालना

विदर्भ आणि मराठवाडय़ात ११ ठिकाणी दूध डेअरी सुरू करण्यात येणार आहे. त्यात विदर्भातील ७ तर मराठवाडय़ातील ४ जिल्ह्य़ाचा समावेश आहे. ४ जूनला त्याचे वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात दूध उत्पाकता वाढावी आणि रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने हा प्रकल्प सुरू केला जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागपुरात दूध केंद्रासाठी ४० जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. २५ लाख लिटर दूध उत्पादन होईल तर विदर्भातील अनेक लोकांना त्याचा फायदा होईल.

अभयारण्यात इलेक्ट्रिक वाहने

विदर्भातील पर्यटनाच्या क्षेत्राला चालना मिळावी आणि देशविदेशातील र्पयटक यावे यासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. ताडोबामध्ये ३५० वाघ आहे, मात्र याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. विदेशी पर्यटकाची संख्या वाढली आहे. जंगलामध्ये जीप्सी वाहने असून त्याचा आवाजामुळे वाघ दिसेनासे होतात. त्यामुळे तेथे इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना राज्य सरकारला केली जाणार आहे. त्यामुळे र्पयटकांची संख्या वाढेल. ताडोबा हे जगाच्या आकर्षणाचे केंद्र होईल.