आघाडी सरकारने महाराष्ट्राला खड्डय़ात टाकले. पृथ्वीराज चव्हाण हे आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय मुख्यमंत्री निघाल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव, मालेगाव तालुक्यांतील कळवाडी येथील जाहीर सभांमध्ये केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस संपूर्ण देशातून ज्या नंदुरबारची निवड करते, त्याच ठिकाणाहून भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेनेने शनिवारी मुंबई येथील सभेत भाजपवर केलेल्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर गडकरींनी शिवसेना आणि मनसेविषयी भाष्य करणे टाळले.
तीनही ठिकाणी झालेल्या सभांमध्ये गडकरी यांनी भाषणाचा संपूर्ण रोख केवळ आघाडी सरकारवर ठेवला. नंदुरबारमध्ये बोलताना महाराष्ट्रात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून विकासाची कामे थांबल्याचा उल्लेख केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे राज्यात अनेक ठिकाणी वीज नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त तर उद्योग व्यवसायही थंडावला आहे. राष्ट्रवादीने लक्ष्मीदर्शनाचा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण हेही गडकरींच्या टीकेतून सुटले नाहीत. महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज करणारे पृथ्वीराज चव्हाण सर्वाधिक निष्क्रिय मुख्यमंत्री निघाले. काँग्रेस व राष्ट्रवादी भाजप हा शेटजी आणि ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा अपप्रचार करून आदिवासी आणि दलितांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप हा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून चालणारा पक्ष आहे. आगामी काळात महाराष्ट्रात रखडलेल्या सर्वच सिंचन प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री सिंचन योजना आणणार असल्याची घोषणाही गडकरींनी केली. विशेष म्हणजे खान्देशातून जाणाऱ्या अमरावती-सूरत महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल सात हजार कोटींचा निधी मंजूर झाला असून तीन महिन्यांत काम सुरू होणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. चाळीसगावच्या सभेत त्यांनी आघाडी सरकारने मुस्लिमांचा कोणता विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला. नांदगाव मतदारसंघातील कळवाडीच्या सभेत त्यांनी केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले. नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित, चाळीसगावमध्ये उन्मेश पाटील तर, कळवाडीत अद्वय हिरे या उमेदवारांसाठी रविवारी सभा झाल्या.