भाजप जातीपातीचे राजकारण करीत नाही. नागपुरात भाजपचे चार आमदार आहेत. गेल्या पाच वषार्ंत नागपुरात एकही दंगल झाली नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून आले की दंगली होतील, अशी भीती निर्माण करून भाजपपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम हक्क परिषदेत केले.
भाजपच्या पूर्व विदर्भ अल्पसंख्याक मोर्चातर्फे गांधीसागरजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी आयोजित मुस्लिम हक परिषदेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव जमाल सिद्दीकी, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हुसेन खान, नागपूर शहर अध्यक्ष एम.ए. रहीम, उपाध्यक्ष हाजी अब्दुल कदीर, माजी उपमहापौर जैबुन्नीसा पटेल, भाजपचे संघटन सचिव श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशात दंगली होतील, असा प्रचार काँग्रेसचे नेते करीत होते. मोदींचा शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या शंभर दिवसांत मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होईल, असा कोणताही निर्णय  केंद्र सरकारने घेतला नाही. उलट देशातील गरीब, दलित, पीडित नागरिकांचे जीवन सुसह्य़ होईल, असेच निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधान जन-धन योजना हे त्याचेच उदाहरण होय. पुढील पाच वषार्ंत मुस्लिमांचा भाजपवर विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन महिन्यांत नागपूर शहरासाठी १३ हजार कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. आम्ही देशाचा सर्वागीण विकास करू पाहात आहे. या विकासात सर्वाचीच साथ हवी आहे. मुस्लिमांनी आता शिक्षणाची कास धरली पाहिजे. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. नागपुरातील मुस्लिम महिलांना एम्ब्रायडरीचे प्रशिक्षण दिले तर रोजगारांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक प्रगती होईल. केंद्र सरकार २५ सप्टेंबरला ‘दिनदयाल स्किल डेव्हलपमेंट योजना’ सुरू करणार आहे. मुस्लिमांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही गडकरी यांनी याप्रसंगी केले.  तत्पूर्वी, मुस्लिमांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना लागू कराव्या, वक्फ बोर्डाला होणारे उत्पन्न मुस्लिमांच्या विकासासाठी खर्च करावे, हज यात्रेचा कोटा वाढवावा, मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, नागपूर-अजमेर रेल्वेच्या वेळेत बदल करावा, या रेल्वेला हजरत बाबा ताजुद्दीन एक्सप्रेस हे नाव द्यावे, ताजबाग ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर योग्य विचार केला जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. याप्रसंगी श्रीकांत देशपांडे व अन्य मुस्लिम नेत्यांनीही त्यांचे विचार मांडले.