रायगड जिल्ह्य़ातील सातही विधानसभेच्या जागा शिवसेना पूर्ण ताकदीने लढवणार असून, शिवसेना यापुढे शेकाप आणि राष्ट्रवादीशी कुठल्याही स्तरावर युती करणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केली आहे. ते अलिबाग येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकाप महायुतीत असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. ती पूर्ण व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र माझे प्रेम एकतर्फी होते. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. यापुढे शेकाप अथवा राष्ट्रवादीशी कुठल्याही स्तरावर शिवसेना युती करणार नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेतील सत्ता सोडावी लागली तरी चालेल, असेही गीते यांनी स्पष्ट केले. आगामी काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा युती तोडून शेकापने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी रायगडच्या जनतेने पुन्हा एकदा शिवसेनेवर आपला विश्वास दाखवत दोन खासदार निवडून दिले. रायगडकरांनी लोकसभेत भगवा फडकवला आहे. विधानसभेतही ते भगव्याला फडकवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेतील पराभवानंतर सुनील तटकरे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव समोर दिसत होता. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग स्वीकारल्याचे गीते म्हणाले. राष्ट्रवादी आणि शेकापचे अनेक नेते सेनेच्या वाटेवर असून येत्या १५ दिवसांत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाईल. विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षात अनेक जण इच्छुक आहेत, पण ही स्पर्धा निकोप असावी, जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून देण्याची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडावी, असा सल्ला त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. अलिबागची जागा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून जिल्ह्य़ात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारा शिवसेनेचा उमेदवार अलिबागचाच असेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या निर्धार मेळाव्याला शिवसेना नेते लीलाधर डाके, रवींद्र चिल्रेकर, उत्तर रायगड जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील यांनीही संबोधित केले. या वेळी दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदेचे पक्ष प्रतोद संजय जांभळे, संदीप घरत यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसनिक उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे २४ तारखेला भूमिपूजन मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते धाराप या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाच्या कामाचे येत्या २४ तारखेला भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी या वेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकार स्वखर्चातून हे चौपदीकरणाचे काम करणार असून, काँक्रीटच्या या रस्त्याचे काम २०१७ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अनंत गीते यांनी या वेळी सांगीतले. अलिबाग तालुक्यातील आरसीएफ प्रकल्प सध्या अडचणीत आहे. गॅस तुटवडय़ाची समस्या प्रकल्पाला भेडसावते आहे. विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा रखडलेला आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी रायगडचा खासदार म्हणून मी प्रयत्नशील राहणार आहे. या संदर्भात लवकरच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत बठक आयोजित केली जाणार असून प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र प्रकल्पाचे प्रश्न मी सोडवतो, प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न कंपनीने सोडवावा असे आवाहन त्यांनी केले. अलिबाग-पेण रेल्वे मार्गासाठी आरसीएफ कंपनीचा रेल्वेमार्ग वापरण्यास कंपनी प्रशासनाने मंजुरी दिली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.