मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या संदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी येथे कानावर हात ठेवले.
जालना लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेनंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मुंडे म्हणाले, पवार यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या संदर्भातील तथ्य मनोहर जोशी किंवा रामदास आठवलेच सांगू शकतील. पवारांनी मागील विधानसभेच्या वेळी युतीसाठी माझ्याशी संपर्क साधलेला नव्हता. पुणे लोकसभा मतदारसंघातील मासळवाडी येथे मतदान केले नाही, तर पाणी तोडण्याची अजित पवार यांची भाषा मस्तवालपणाची आहे. सत्तेवरून दूर करून त्यांची ही मस्ती जिरवू, असेही मुंडे म्हणाले.
तत्पूर्वी अंबड येथील जाहीर सभेत मुंडे म्हणाले, की सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य वीज भारनियमनमुक्त करण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. मराठवाडय़ात गारपीट झालेल्या ज्या भागात मुख्यमंत्री येऊन गेले तेथे तातडीने पंचनामेही झाले नाहीत. दुष्काळाच्या वेळी मराठवाडय़ास गरज असतानाही राज्य सरकारने जायकवाडीत वरच्या धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले नाही. फक्त ९ टीएमसी पाणी सोडले आणि त्यामुळे मराठवाडय़ाची गरज भागली नाही. गारपीट झाल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु राज्य शासनाने त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक मदतीचा हात पुढे केला नाही. भाजपचे सरकार आले तर राज्यातील मंत्रालयास लागलेल्या आगीची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. उमेदवार दानवे, हरिभाऊ बागडे, अर्जुनराव खोतकर, आमदार संतोष सांबरे, भास्कर अंबेकर इत्यादींची उपस्थिती या वेळी होती.