महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या रेणुकेच्या माहूर येथे नगराध्यक्ष काँग्रेसच्या गौतमी कांबळे यांच्याविरुद्ध स्वपक्षीयांसह सर्वच अकराही सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मतदानाच्या वेळी प्रस्ताव दाखल करणारे सारेच नगरसेवक गैरहजर राहिल्याने बारगळल्याची अपूर्व घटना घडली आहे. आपल्या पाठीशी एकही नगरसेवक नसताना नगराध्यक्ष म्हणून पदावर असलेल्या गौतमी कांबळे या महाराष्ट्रातील एकमेव नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
माहूरच्या १७ सदस्यीय नगरपालिकेत राष्ट्रवादीचे पाच सदस्य निलंबित आहेत. १२ सदस्यांपैकी काँग्रेसच्या गौतमी कांबळे नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याविरुद्ध उर्वरित सर्व अकराही सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यात काँग्रेसचे शिवलिंग टाकळीकर, शेख मुस्तफा, राजेंद्र केशवे असे ३, शिवसेनेचे बालाजी वाघमारे, राजीव गढलवार, फाशा जाधव आणि पुष्पा तेलारे असे ४, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, शोभा माहनुले, ज्ञानेश्वर लाड आणि अध्यक्ष दीपक बनगीनवार, अशा अकराही सदस्यांनी केलेल्या प्रस्तावाच्या मतदानाच्या दिवशी गैरहजर राहून नवा विक्रम केला. एकही नगरसेवक मतदानाला हजर न राहिल्यामुळे निर्वाचन अधिकारी रामेश्वर रोडगे, काकासाहेब डोईफोडे आणि वैद्यनाथ स्वामी यांनी गौतमीविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे जाहीर केले. आपल्या पाठीशी एकही नगरसेवक नाही, पण जनतेचे प्रेम आणि केलेली विकासाची कामांमुळे मी अध्यक्षपदावर कायम आहे, अशी नगराध्यक्ष गौतमी कांबळे यांची प्रतिक्रिया आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या गौतमी कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याचे कबूल करून सेनेच्या मदतीने आपल्याच नगराध्यक्ष गौतमी यांना पायउतार करण्याचे ठरवले. माहूर पालिकेतील राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांनीही अविश्वास प्रस्तावावर सह्य़ा केल्या होत्या. दरम्यान, काय घडले हे कोणालाही समजले नाही आणि प्रस्ताव दाखल करणारे अकराही सदस्य मतदानाच्या वेळी गैरहजर राहिल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळला. सध्या या घटनेचीच सार्वत्रिक चर्चा आहे. गौतमी कांबळे यांना पायउतार करून काँग्रसच्या शिवलिंग टाकळीकरांना अध्यक्षपद देण्याचा आणि सेनेच्या नगरसेवकाला उपाध्यक्षपद देण्याचे मनसुबेही ढासळले आहेत.