नक्षलवाद्यांच्या भीतीने अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा ही चार तालुक्याची ठिकाणे वगळता अतिदुर्गम भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार नाही. दामरंचाचे उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे यांच्या हत्येनंतर तर अतिदुर्गम भागात प्रचार अक्षरश: थंडावलेला दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात २४ एप्रिलला अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक, तर ४३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. प्रचाराचा उद्या, २२ एप्रिल हा शेवटचा दिवस असतांना तालुक्याचे ठिकाण वगळता अतिदुर्गम भागातील गावात निवडणुकीचा प्रचार नावालाही नाही. या चारही तालुक्यातील गावांमध्ये नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत दिसत आहे. त्यामुळे उमेदवार व गावकरी प्रचार करत नसल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर व पत्रके वाटून गावकऱ्यांना निवडणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही गावकरी हिरीरीने सहभागी होत असल्याचे बघून दामरंचाचे उपसरपंच पत्रू दुर्गे यांची काल गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर तर गावातील माणूस निवडणूक प्रचारासाठी घराबाहेरही पडायला तयार नाही. आम्हाला आमचा जीव प्रिय आहे, असे म्हणून गावकरी घरातच बसून आहेत. याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. जो कुणी निवडणुकीत सक्रीय राहील त्याला जिवानिशी ठार करू, अशीही नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. त्यामुळे जिल्हा व पोलिस दलाने  कडक पोलिस बंदोबस्त तैनात करून मतदान प्रक्रिया राबविण्याची
तयारी सुरू असली तरी प्रत्यक्ष मतदानात किती लोक सहभागी होतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे.
कोटमी या ग्राम पंचायतीत तर सलग १५ वर्षांंपासून निवडणूक झालेली नाही. कारण येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुणीही समोर येत नाही. पूर्णत: नक्षलग्रस्त गावात २००१ मध्ये प्रथम निवडणूक घेण्यात आली तेव्हा काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, नक्षलवाद्यांनी भीती दाखविताच सर्व उमेदवारांनी ते मागे घेतले. आज २०१५ सुरू आहे. केवळ कोटमीच नाही, तर ४३ ग्राम पंचायतींमध्ये एक ते दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे अशाही ग्रामपंचायतीममध्ये निवडणूक होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नक्षल्यांची दहशत बघता गावकरी बाहेर पडायलाही तयार नसल्याने २४ एप्रिलला होणारी निवडणूक नेमकी कशी होते, याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.