माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा एकीकडे रंगत असताना दुसरीकडे भाजप शहराध्यक्षांनी मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अन्य पक्षातून कोणालाही पक्षात प्रवेश न देण्याचे साकडे प्रदेशाध्यक्षांना घातले आहे. दरम्यान, भाजप नेत्यांची समिती उद्या (शनिवारी) येथे येणार आहे. ही समिती सर्वच मतदारसंघांत आढावा घेणार असून कोण कोण इच्छुक आहेत हे तपासणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सध्या अनेकजण आपले राजकीय अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी पावले टाकत आहेत. नांदेड लोकसभेत खतगावकर यांची उमेदवारी अशोक चव्हाण यांनी मिळविली व ते विजयी झाले. चव्हाण यांच्या विजयानंतर खतगावकर यांना सुरक्षित ठिकाणी संधी दिली जाईल, असे वाटत होते. पण अजून त्यांना कोणत्याही मतदारसंघाबाबत आश्वस्त केले गेले नाही. खतगावकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांची नागपुरात भेट घेतली. या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली. त्यांचा प्रवेश अजून निश्चित नसला, तरी भाजप शहराध्यक्ष अॅड. चतन्यबापू देशमुख यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अन्य पक्षातून येणाऱ्यांना प्रवेश देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घ्या, असे साकडे घातले आहे. पक्षाची लाट असल्याने अनेकजण पक्षात प्रवेशास इच्छुक आहेत. पण गेल्या २० वर्षांपासून पक्षवाढीसाठी संघर्ष करणाऱ्यांना किंवा प्रामाणिकपणे पक्ष वाढविणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय उपऱ्यांना प्रवेश देऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे. एखाद्याच्या प्रवेशाने पक्षाला किती फायदा होईल किंवा तोटा होईल याचा इत्थंभूत विचार करून निर्णय करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजप-शिवसेना युती अभेद्य असल्याचा दावा वरिष्ठ करीत असले, तरी स्थानिक पातळीवर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत पक्षांच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. किनवट व नायगाव हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत.