मजलिस-ए-इत्तेहाद्दुल मुसलमीनचे (‘एमआयएम’) खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पोलिसांनी शहरात येण्यास मज्जाव केला आहे. नोटीस बजावण्यास पोलीस अधिकारी हैदराबादला रवाना झाले आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत ओवेसी आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली. सभेच्या परवानगीबाबत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उद्या निर्णय होणार आहे. तत्पूर्वीच पोलिसांनी प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. महापालिकेतील दोन नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करणार होते. तसेच ओवेसी यांची सभा व सत्काराचा कार्यक्रम घेण्यास नगरसेवक जावेद कुरेशी यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, शहरातील ईदगाह मैदानावर होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. नुकतीच धुळे येथे दंगल झाली, तेव्हा शहरात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर एमआयएमच्या आमदाराच्या प्रक्षोभक भाषणाची चित्रफीत पसरवली गेली. त्यामुळेही ओवेसी आले तर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल, असे पोलिसांचे मत होते. त्यामुळे सभेला परवानगी नाकारली गेली. त्यानंतरही एमआयएमचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी कोपरा सभा घेत आहेत. या पाश्र्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शहरात येऊ नये, यासाठी १४४ (१) या कलमान्वये नोटीस बजावण्यात आली , असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले.