गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात जातात. यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी ही दरवर्षीची आहे त्यामुळे या काळात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू, रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांना बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता तसेच त्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. १ सप्टेंबर पासून ही बंदी लागू करण्यात येईल तर १६ सप्टेंबरपर्यंत ही बंदी असेल.
‘कोकणात जाण्या-या प्रवाशांसाठी गणेशोत्सवाच्या काळात जादा गाड्या सोडण्यात येतात, अशात जड वाहतूक करणा-या गाड्यांमुळे यामार्गावर वाहतुक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेचे दिवाकर रावते यांनी सांगितले. जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू, रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांच्यासाठी ही बंदी असेल पण दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल, ऑक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू होणार नाही असेही रावते यांनी स्पष्ट केले.
पुढील रस्त्यावर वाहतुकीसाठी बंदी असेल
पनवेल ते इन्सुली ( सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू / रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध
– १ ते ५ सप्टेंबर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
– ६ ते १४ सप्टेंबर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू / रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी
– ९ सप्टेंबर रात्री ८ वाजल्यापासून ते दि. १२ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी
– अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनानिमित्त दिनांक १५ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर पर्यंत सकाळी आठ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंदी