अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे हिंगोली तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ते सरकारच्या अनुदानापासून वंचित आहेत, तर लाभाचे लोणी भलत्यांनाच मिळाल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भिर्डा येथील श्रीरंग पुरी, सुनील नाईक, गंगाबाई नाईक, भास्कर भारती, सुभाष नाईक, छायाबाई भारती यांच्यासह अनेक वंचितांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. मुळात गारपीटग्रस्तांची यादी खोटी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले, ते लाभापासून वंचितच असून भलत्यांनाच मदतीचा फायदा मिळत असल्याचा आरोप तक्रार निवेदनात केला आहे.
संबंधित गावच्या तलाठय़ाने या भागात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले, त्यांची घटनास्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी न करता घरी बसूनच पंचनामे केले. परिणामी खरे लाभार्थी दुर्लक्षित राहिले. या बरोबरच नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, यासाठी तयार केलेल्या यादीत एकाच कुटुंबात राहणाऱ्या लाभार्थीची नावे टाकून त्यांना अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
गारपीटग्रस्तांची नावे तलाठय़ाच्या हलगर्जीपणामुळेच यादीत समाविष्ट झाली नाहीत. तक्रारदार शेतकरी गरीब कुटुंबातील असून त्यांना नुकसानभरपाई मिळावी. नुकसानीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे नमूद करून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.