सांगलीच्या कृष्णातिरी उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर बाबाराव स्मारकाला लावलेल्या आगी मागील नेमके कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसले तरी या मागे माथेफिरू असावा असा संशय गृहीत धरून तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री स्मारकाला अज्ञाताने आग लावल्याने पंधराशे पुस्तके जळाली असून ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असल्याचे उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले.
मंगळवा, १० जून रोजी सांगलीच्या कृष्णातिरावरील सिद्धार्थनगर परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या स्मारकाला आग लावण्याचा प्रकार घडला. पोलिसांना या घटनेची निनावी दूरध्वनीवरून माहिती कळताच तातडीने हालचाली झाल्या असल्यातरी हे कृत्य करणाऱ्या अज्ञाताचा शोध लावण्याइतपत कोणताही पुरावा घटनास्थळी मिळून आलेला नाही. स्मारकामध्ये ग्रंथालय असून लाकडी रॅकमध्ये ठेवलेली पंधराशे पुस्तके व सोफासेट या आगीत खाक झाली असून २ लाखांचे नुकसान झाले आहे. संग्रहित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकरांची ग्रंथसंपदा आहेच पण त्याचबरोबर सांस्कृतिक, धार्मिक पुस्तकांचा समावेश होता. या शिवाय लोकमान्य टिळकांचे जुने केसरीचे अंकही संग्रहित करण्यात आले होते.    
स्मारकाला लागलेल्या आगीचा तपास पोलीस यंत्रणा गांभीर्याने करीत असून अद्याप या प्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. असे उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले. जातीय संघर्षांतून हा प्रकार झालेला नसावा मात्र या मागे एखाद्या माथेफिरूचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत बनसोडे म्हणाले की, पोलीस सर्व शक्यता गृहित धरून तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास स्वत पोलीस निरीक्षक राजू मोरे हे करीत आहेत.
क्रांतिवीर बाबाराव सावरकर स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीत सांगलीमध्ये वास्तव्यास होते. आजारी पडल्यानंतर त्यांचे १२ मार्च १९४५ रोजी सांगलीतच निधन झाले. त्यांच्यावर कृष्णातिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात आले असून १९८८ मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. हे स्मारक उभारण्यासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे आदींनी मोलाची मदत केली होती. या ठिकाणी पक्ष विरहीत उपक्रम विश्वस्तांमार्फत राबविण्यात येत असल्याचे सावकर प्रतिष्ठानचे कार्यवाह सुहास जोशी यांनी सांगितले.
सोलापूरचे नूतन खासदार शरद बनसोडे हे बाबाराव सावरकरांचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. त्यांचीही बाबारावांच्या ठायी श्रद्धा आहे. त्यामुळे या घटनेनंतर खा. बनसोडे हे दि. १५ जून रोजी स्मारकास भेट देणार असल्याचे भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मकरंद देशपांडे यांनी सांगितले.