गेल्या वर्षभराच्या काळात भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. आमचे विरोधी पक्षदेखील आमच्यावर एका पैशाचादेखील भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोल्हापूर येथील भाजपच्या राज्य अधिवेशनात केला. भाजपने देशातील जनतेला भ्रष्ट्राचारमुक्त शासनाचे वचन दिले होते. आता २६ मे रोजी केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, मात्र एकही घोटाळा बाहेर आलेला नाही, असे अमित शहा यांनी सांगितले. यावेळी अमित शहांनी कार्यकर्त्यांसमोर गेल्यावर्षभरातील भाजपच्या संघटनात्मक आणि सरकारी पातळीवरील यशाचा पाढा वाचला.
यूपीए सरकारच्या काळात बारा लाख कोटींचे घोटाळे झाले. याशिवाय, गेल्या ६० वर्षांमध्ये काँग्रसने काळा पैसा आणण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नव्हते. याउलट, भाजपने सत्तेत आल्यावर पहिल्या दीड महिन्यात संसदेत ठराव मंजूर करून विशेष तपास पथकाकडे माहिती दिली. त्यामुळे काँग्रेसने आमच्याकडे एक वर्षाच्या कामगिरीचा हिशोब मागू नये, असे अमित शहांनी सांगितले. देशातील गरिबीचे निर्मुलन करायचे असेल प्रथम बेरोजगारीची समस्या सोडविली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात ‘मेक इन इंडिया’सारखे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. याउलट आधीच्या सरकारने गरिबी निर्मूलनासाठी काहीही न करता निव्वळ घोषणा देण्याचे काम केल्याचे अमित शहांनी सांगितले.