* पश्चिम घाटातील पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट
* शंभर वर्षांत ८०० मिलिमीटरची घट
धो-धो पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरवर पाऊस रुसला असून, तेथील पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या एकशेदहा वर्षांमध्ये तेथील पावसाच्या प्रमाणात तब्बल ८०० मिलिमीटरची घट झाली आहे. महाबळेश्वरप्रमाणे एकूणच पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे गेल्या ११० वर्षांच्या आकडेवरीवरून स्पष्ट झाले आहे. घाटातील पाऊस कमी होण्यामागे नेमके
काय कारण आहे, याचे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही. पुण्यातील ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज’ या संस्थेचे प्रमुख डॉ. आर. कृष्णन, जे. व्ही. रेवडेकर आणि मिलिंद मुजुमदार यांनी हा अभ्यास केला आहे. देशातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशात पश्चिम घाटाचा समावेश होतो. त्याच्या डोंगररांगा गुजरातपासून केरळपर्यंत, पश्चिम किनारपट्टीला समांतर जातात. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे घाटात धो धो पाऊस पाडतात. याच घाटात महाबळेश्वर, लोणावळा, अंबोली अशा अतिपावसाच्या ठिकाणांचा समावेश होतो. या भागातील पावसावर गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये काय परिणाम झाला आहे, याचा अभ्यास ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज’ तर्फे करण्यात आला. त्यासाठी डॉ. कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासगटाने १९०१ ते २०११ या काळातील प्रत्येक दशकाच्या पावसाची सरासरी अभ्यासली. त्यात असे आढळले की, एकूणच घाटात पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. कोकण व गोव्यात प्रत्येक दशकाला दोन टक्के इतक्या प्रमाणात पावसाची घट झाली आहे, तर केरळमध्ये हे प्रमाण दशकाला एक टक्क्य़ाच्या आसपास आहे. महाबळेश्वर येथे तर पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. तिथे दर दशकाला ७१ मिलिमीटर या प्रमाणात पावसात घट झाली आहे. त्यामुळे १९०१ ते २०११ या तब्बल ११ दशकांच्या काळात पावसाचे प्रमाण पावणेआठशे ते आठशे मिलिमीटरने कमी झाले आहे. १९०१ च्या आसपास महाबळेश्वर येथे सहा हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडायचा. त्यात सातत्याने घट झाली आहे. या बदलाचा पश्चिम घाटातील
जैवविविधतेवर परिणाम होईल का, अशी काळजी या अभ्यासात व्यक्त झाली आहे.
नेमके कारण काय?
‘घाटातील पाऊस कमी होण्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत आताच ठामपणे सांगता येणार नाही. हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो किंवा पावसातील नैसर्गिक चढउताराचा भागसुद्धा असू शकतो. याबाबत आताच कोणता निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल,’ असे डॉ. कृष्णन यांनी सांगितले.