कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी पैशाचे वाटप करताना राष्ट्रवादीचे तीन कार्यकर्ते रंगेहाथ पकडले. त्यासंदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परांजपे यांचा थेट उल्लेख न करता हे पैसे पक्षाकडून रिक्षाभाडे म्हणून दिले जात होते, असा खुलासा केला. शिवाय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अतिरेक केला जात असल्याची नाराजीही व्यक्त केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ शहरात आयोजित केलेल्या जाहीर सभेतच पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांनी परांजपे यांचे थेट नाव घेतले नाही. खुलासा त्यांनी अत्यंत सावधपणे केला. त्यामुळे श्रोत्यांनाही त्याचा उलगडा लवकर झाला नाही. पवार म्हणाले, जोपर्यंत उमेदवार अर्ज भरत नाही तोपर्यंत खर्च हा पक्षाला करावा लागतो. आधीचा खर्च पक्षाचा व अर्ज भरल्यानंतरचा खर्च हा उमेदवाराचा असतो. तसा हिशोब आयोगाला दिला जातो. मुंबईत रिक्षाचे भाडे दिले जात असताना उमेदवार पैसे वाटतो म्हणून केस दाखल केली जाते, एवढेच नव्हेतर कोकणात तीन दिवस सुटय़ा असताना अनेक पर्यटक गाडय़ा घेऊन मुलाबाळांसह गेले. त्यांच्या गाडय़ा तपासण्यात आल्या. ५० हजाराच्यापुढे पैसे सापडले तर ते जप्त केले, गारपीट झालेल्या भागात काही सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांनी वर्गणी जमा क्न३न मदत केली. तर त्यांच्यावर कारवाई केली. १० लाखांपेक्षा जास्त पैसे काढले तर बँकांनी आयोगाला कळवायचे, आयकर खात्याला चौकशी करायला लावायची, असे सुरू आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांना मदत करताना अडचणी येत आहेत असे सांगत त्यांनी आयोगाबद्दल थेट टीका न करता अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
गारपीटग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय झाला पण आचासंहितेमुळे तो जाहीर करता येत नाही. मदत केली नाही म्हणून विरोधक टीका करतात. पूर्वी नुकसानीची पाहणी करायला जाताना अधिकारी बरोबर असत. तेथे जागच्या जागी निर्णय केले जात, सूचना दिल्या जात. आता या वेळी पाहणीला जाताना अधिकारी सोबत नव्हते. आचारसंहितेमुळे अडचणी जरूर आहेत. पण जनतेला मदत करताना तसूभर कमी पडणार नाही, असे पवार यांनी सांगितले.