३३ वर्षांपासून वेतनवाढ नाही; प्रस्ताव अजूनही विचाराधीन

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात गेल्या ३३ वर्षांपासून एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. विद्यार्थी अनेक वर्षांपासून मागणी करताहेत. सत्ताबदलही झाला, पण अजूनही विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीनच आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील एकूण प्रशिक्षणार्थीपैकी आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ४० रुपये तसेच मागासवर्गीय प्रशिक्षणार्थीना दरमहा ६० रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यात १९६० मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासह निवास, भोजन आदी सुविधांसाठी शासनाकडून विद्यावेतन म्हणून ४० रुपये दिले जात होते. त्यावेळी हे विद्यावेतन पुरेसे होते. पण, त्यानंतर दिवसांगणिक प्रत्येक वस्तूचे दर कितीतरी पटीने वाढले. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ केली. अन्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनात वेळोवळी सुधारणा करण्यात आली, पण औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. १९८४ मध्ये या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात केवळ वीस रुपयांची वाढ करून ते ६० रुपये करण्यात आले. गेल्या ३३ वर्षांपासून विद्यावेतनात  वाढ झालेली नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने गरजू आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असतात. या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाशिवाय कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.

आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात समाधानकारक वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. पण, त्यांच्या मागण्यांकडे अजूनही लक्ष दिले गेलेले नाही.

महिन्याचा खर्च तीन ते चार हजार

राज्यात मोजक्या ठिकाणीच वसतिगृहांची सोय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाडय़ाची खोली घेऊन निवासाची व्यवस्था करावी लागते. एका विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य खरेदीवर  महिन्याकाठी तीन ते चार हजार रुपये सहज खर्च होतात. मात्र, या विद्यार्थ्यांना मिळतात फक्त साठ रुपये, ते देखील दर महिन्याला कधीच मिळत नाहीत. तीन ते चार महिन्यातून एकदा उपकार केल्याच्या भावनेतून पैसे मिळत असल्याची विद्यार्थ्यांची खंत आहे.