आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आता कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान मिळणार नाही. मात्र ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना पक्ष प्रवेशच करावा लागेल असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार बठकीत व्यक्त केले. याशिवाय विधानसभेच्या ३० जागा आम्हाला मिळाव्यात अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांकडे मांडली असून खुल्या प्रवर्गातील किमान १० जागा त्यामध्ये असाव्यात असेही त्यांनी सांगितले.
या वेळी सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे यांच्यासह स्थानिक पक्ष, नेते, कार्यकत्रे उपस्थित होते. तत्पूर्वी सांगली दौऱ्यावर आलेल्या श्री. आठवले यांनी आज तमाशा कलावंत बाळू ऊर्फ अंकुश खाडे व पत्रकार अनिल कांबळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दौऱ्यात त्यांनी आमदार संभाजी पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. आठवले यांनी काळू-बाळू यांच्या स्मृती लोककला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सांगलीत जपली जावी अशी मागणी केली. या केंद्राच्या इमारतीसाठी पंचवीस लाख रुपयांचा खासदार निधीही त्यांनी जाहीर केला.
ते म्हणाले, ‘मोदींची विकासविषयक भूमिका संकुचित करण्याचे प्रयत्न गिरिराज किंवा रामदेवबाबांसारखी मंडळी करीत आहेत. रामदेवबाबा संत म्हणून घेतात. त्यांच्या तोंडी राहुल गांधींबद्दलची भाषा अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आम्ही त्यांचा निषेध करतो. आम्ही एनडीएमध्ये आलो तेव्हा भाजपशी अनेक मुद्द्यांवरील आमचे मतभेद कायम ठेवून आलो आहोत. जसे पूर्वी काँग्रेसबाबतीतही होते. डॉ. बाबासाहेबांनी काँग्रेसला ‘जळते घर’ म्हटले होते तरीही आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे आमच्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही एनडीएमध्ये आहोत. आर. आर. पाटील यांना माझ्यावर चत्यभूमीवरून हेडगेवारांच्या समाधीला माथा टेकायला गेल्याची केलेली टीका नराश्यातून आहे. माझ्यासोबत दलित जनता महायुतीकडे आकर्षति होणार नाही असा त्यांचा होरा चुकल्याने ते आता मला लक्ष्य करीत आहेत, असेही श्री. आठवले यांनी या वेळी सांगितले.